

Marathwada News : राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात वर्णी लागावी यासाठी ज्योतपुरी, कोट शिवून बसलेल्या शिंदे गटाच्या आमदारांची खुद्द अजित पवार विरोधी पक्षनेते असतांना खिल्ली उडवत होते. (Mp Priyanka Chaturvedi News) आता त्याच अजित पवार व समर्थक आमदारांच्या सत्तेतील सहभागाने मंत्रीमंडळ विस्तारातील शिंदे व भाजप गटातील आमदारांची संधी लांबली. आता काही मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही याची जाणीव झालेल्या शिंदे गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
या मंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वाधिक चर्चेतील नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे (Sanjay Shirsat) आमदार तथा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट. आता मंत्रीपद न मिळाल्यामुळे प्रचंड नाराज असलेल्या शिंदे गटातील एका आमदाराला तब्बल दीडशे कोटींचा निधी देवून बोळवण केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आहे.
एका ट्विटच्या माध्यमातून त्यांनी हा आरोप केला असून, अशा पद्धतीने करदात्या जनतेच्या पैशाचा गैरवापर आपल्या आमदारांना खूष करण्यासाठी केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Shivsena) हा आमदार कोण? याची चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी चतुर्वेदी यांच्या ट्विटला उत्तर देत ते आमदार संजय शिरसाट असल्याचा दावा केला आहे.
शिंदे गटातील चाळीस आमदारांनी बंड केल्यापासून ते राज्यातील सत्ता स्थापनेपासून संजय शिरसाट हे मंत्रीपदासाठी इच्छूक आहेत. पहिल्या मंत्रीमंडळाच्या वेळी मंत्री म्हणून शपथविधीसाठी हजर राहा, असा निरोप मिळून देखील ऐनवेळी त्यांची संधी हुकली होती. संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांना त्यावेळी मंत्रीमंडळात घेण्यात आले होते. दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात समावेशाचा शब्द शिरसाटांना मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र हा दुसरा विस्तार वर्ष उलटले तरी झाला नाही. उलट राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्याने शिवसेनेच्या वाट्याची महत्वाची खाती अजित पवारांनी पळवली.
पावसाळी अधिवेशनापुर्वी मंत्रीमंडळ विस्तार अपेक्षित होता, पण तिथेही अपक्षाभंगच झाला. त्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार होणे नाही हे शिंदे गटातील आमदारांच्या लक्षात आले असावे. म्हणून किमान मिळेल तेवढा निधी खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची चर्चा देखील या निमित्ताने सुरू आहे. चतुर्वेदी यांच्या ट्विटमधून याला दुजोरा मिळतो. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या महाराष्ट्रातील एका गद्दार आमदाराला राज्य सरकारने १५० कोटींचाविकास निधी दिला आहे. सरकार एकत्र ठेवण्यासाठी करदात्यांच्या पैशाची ही निर्लज्जपणे लूट आहे. त्यांच्या अनैतिकतेला मर्यादा नाही, असे चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.