
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत महायुती 200 पार झाल्यानंतर महाविकास आघाडी कडून ईव्हीएम वर संशय घेण्यास सुरुवात झाली आहे. ईव्हीएम हॅक झाल्याशिवाय महायुतीला एवढा मोठा विजय मिळणे शक्यच नाही, असा दावाही काही नेत्यांकडून केला जात आहे. एवढेच नाही तर देशात पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, यासाठी काँग्रेस स्वाक्षऱ्यांची मोहिम उभारण्याच्या तयारीत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीसह विरोधकांना जाहीर आव्हान दिले आहे. ईव्हीएम हॅक करता येत असेल तर जाहीररित्या करून दाखवा, अशा शब्दात दानवे यांनी विरोधकांना सुनावले. निवडणुकीत पराभव झाला की ईव्हीएम वर आक्षेप घ्यायचा ही विरोधकांची जुनी सवय आहे.
हिमाचल प्रदेश मध्ये आम्ही निवडणूक हरलो तेव्हा ईव्हीएम वर आक्षेप घेतला का? असे म्हणत दानवे यांनी ईव्हीएम हॅक करताच येऊ शकत नाही. जर कोणाचा असा दावा असेल तर एखाद्या तज्ञ इंजिनियरला आणून ते हॅक करून दाखवा, असे प्रति आव्हान दानवे यांनी दिले. (Mahavikas Aghadi) माध्यमांशी राज्यातील सद्य परिस्थिती, मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होण्यास होणारा विलंब, महत्त्वाच्या खात्यांसंदर्भात महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाकडून केले जाणारे दावे, अशा सगळ्याच विषयावर रावसाहेब दानवे यांनी आपली भूमिका मांडली.
तीन पक्षांचे सरकार जेव्हा सत्तेवर येते तेव्हा समन्वयाने काम करावे लागते. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही. महायुतीचे नेते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री निवडतील. यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली आणि चर्चा सुरू आहेत. त्यामुळे विलंब होतोय, कुठे काही नाराजी आहे, अशा चर्चांना काही अर्थ नाही. महायुती सरकारचा नवा मुख्यमंत्री कधी जाहीर होणार? शपथविधी कधी होणार?
या संदर्भात अद्याप पक्ष श्रेष्ठींकडून आम्हाला कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत याचा. अर्थ आमच्या मध्ये रस्सीखेच किंवा वाद आहेत असे मुळीच नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले. ईव्हीएम च्या विरोधात ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी आंदोलनाचा इशारा दिला, यावर दानवे यांना विचारले असता आम्ही त्यांचा आदर करतो असे म्हणत अधिक बोलणे टाळले. हिमाचल प्रदेशात आम्ही निवडणूक हरलो तेव्हा कोणी ईव्हीएम वर आक्षेप घेतला नाही. आम्ही हरलो होतो तरी जनतेचा कौल म्हणून आम्ही तो स्वीकारला.
कुठला आक्षेप किंवा दोष ईव्हीएमला दिला नाही. ईव्हीएम हॅक करता येत असेल तर जाहीररित्या करून दाखवा, याचा पुनरुचार रावसाहेब दानवे यांनी केला. जनतेने त्यांना नाकारले आहे जेव्हा जेव्हा आमच्या बाजूने जनादेश येतो तेव्हा विरोधक ईव्हीएम वर आक्षेप घेतात, असा टोलाही दानवे यांनी लगावला. शिवसेनेचे राज्य प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी नव्या सरकारमध्ये गृहमंत्री पद शिवसेनेकडे असेल असे मत व्यक्त केले.
याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, पण कोणाला कोणते खाते द्यायचे हे वरिष्ठ ठरवतील, असे सांगत दानवे यांनी या विषयाला बगल दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तुमच्यासोबत येतील का? या प्रश्नावर ते माझे मित्र आहेत पण महादेव यांचा एक पाय आमच्याकडे तर दुसरा तिकडे असतो असा, टोला दानवे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.