Solapur, 06 November : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का?, या प्रश्नावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी होतील किंवा नाही, असे उत्तरच दिले नाही. भाजपमध्ये पक्षनेता निवडण्याची एक पद्धत आहे. पक्षनेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला सर्वांना मान्य असणार आहे, असे सांगून फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा चेंडू हायकमांडच्या कोर्टात ढकलला आहे.
दरम्यान, महायुती सरकार (Mahayuti Government) जनहिताचे निर्णय घेत आहे, त्यामुळे लोकसभेत आमचा पराभव झाला असली तरी जनता विधानसभा निवडणुकीत आमच्या पाठीशी आहे. महायुतीचे 180 आमदार निवडून येतील, असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला.
सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत विचारलेल्या प्रश्नावर पक्षनेतृत्वाकडे बोट दाखवले आहे.
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) विधानावर दानवे म्हणाले, राहुल गांधी यांचं भाषण पाहिलं तर संविधान, घटना, भाजप, आरएसएस या भोवती असतं. मात्र, पुढे काय केलं पाहिजे, यावर ते बोलत नाहीत. जी-20 मध्ये अनेक देशांतील लोक आले आणि त्यांनी भारताचे कौतुक केलं. मात्र, त्यावेळी राहुल गांधी बाहेर देशात जाऊन लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत होते. अशा पद्धतीने दुसऱ्या देशात जाऊन देशाची बदनामी करणे हा देशद्रोह आहे. संघाला आर्थिक रसद पुरवले जातं असल्याचा आरोपी निराधार आहे.
राहुल गांधींवर अर्बन नक्षलवादाचा करण्यात आलेल्या आरोपावर दानवे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी जे आरोप केले आहेत, ते खरे आहेत. संविधान बाबासाहेबांनी लिहिलं. पण, त्यांच्याबद्दल प्रेम असतं तर भंडारा आणि दादरमध्ये बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार दिला नसता. हे लोकं सत्ता मिळविण्यासाठी ढोंग करतात. संविधानाचा खरा आदर हा भाजपकडून केला जात आहे. मोदी निवडणून आल्यानंतर संविधानाची सर्वात आधी पूजा केली. काँग्रेसने कधीच केलं नाही.
नारायण राणे आणि एमआयएमचे उमेदवार कोणीही असो अशा प्रकारचे वक्तव्य करणं चुकीचं आहे. नारायण राणे असतील किंवा इतर कोणी पक्षातील नेते असतील, त्यांनी असे वक्तव्य करू नये, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. मनसेबाबत मी पक्षश्रेष्ठींची चर्चा करून बोलेन. मी सोलापूरमध्ये आल्यानंतर शिवडी आणि हिंगणी मतदारसंघाच्या पाठिंब्याच्या गोष्टी घडल्या असतील, मला त्या बाबतीत माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना जनरल डायरची उपमा दिल्याबद्द दानवे यांनी म्हणाले, जनरल डायर ही उपमा शरद पवार यांना 1990-95 दरम्याना तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली होती. ज्यावेळी नागपुरात गोवारी हत्याकांड झालं आणि आदिवासींवर अमानुषपणे लाठीहल्ला केला होता. मागचे शब्द वाचून पुढचा प्रयोग करण्याचे काम रोहित पवार करत आहेत.
सुरतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तर आनंद आहे. तसेच, मुंब्र्यातही पुतळा उभारला तरी काहीही चुकीचे नाही. शिवाजी महाराजांचे पुतळे सगळ्या वस्तीमध्ये उभारले तरी या राज्यातील जनतेला आनंदच होईल, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांच्या काळात कोणत्याही वर्गाला न्याय देण्याचं काम झालं नाही. उद्धव ठाकरे यांच्या काळात भाजपने सुरू केलेल्या योजना बंद करण्याचं काम केलं. भाजपचं सरकार आल्यानंतर नवीन योजना आणल्या गेल्या आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात, राज्यातील कंपन्या बाहेर गेल्या. पण, भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात शेतकऱ्यांचे साधं वीजबिल माफ करू शकले नाही. लाडकी योजनेसंदर्भात महाविकास आघाडीने तक्रार केली होती, पण, लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात कदापि बंद होणार नाही, असा दावाही दानवेंनी केला.
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये बेबनाव झाला. त्यातील एक गट (एकनाथ शिंदे) बाहेर पडला अन तो आमच्या सोबत आला. त्या गटाला न्याय देण्याचे काम आम्ही केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या विधानावर मात्र उत्तर देणं त्यांनी टाळलं. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी बसून बंडखोरी करणाऱ्यांना हाकलण्याचे आदेश दिले आहेत. बंडखोरीचा आम्हाला कोणताही फटका बसणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.