Chhatrapati Sambhajinagar : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्याला यश आल्याचा दावा केला जातोय. गुलाल उधळला जातोय फटाके फोडले जात आहेत. पण बॉस काही तरी चुकतंय, बेसावध मराठ्यांना सरकारने फसवले आहे, असा आरोप मराठा आरक्षणासाठी पहिला राजीनामा देणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न दिल्लीतच सोडवावा लागेल, असा दावाही जाधव यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठा समाजाला ओबीसींचे आरक्षण लागू करण्यासाठी आंदोलन सुरू केले. तेव्हा हर्षवर्धन जाधव(Harshvardhan Jadhav) यांनी अंतरवालीत जाऊन जरांगे यांना पाठिंबा दर्शवला होता.
पण त्या उपोषण स्थळावरून जाधव यांनी 'ओबीसीतून आरक्षणाची मागणी चुकीचे आहे, त्यापेक्षा मराठा आरक्षणासाठी 50 टक्के मर्यादेची अट शिथील करण्यासाठी संसदेत कायदा करण्याची मागणी केली पाहिजे. तरच मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेल आणि एकदा संसदेत कायदा झाला, तर त्याला सर्वोच्च न्यायालय देखील रोखू शकणार नाही.' अशी भूमिका मांडली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीकेची झोड उठली होती. समाजमाध्यमांवरही ते ट्रोल झाले होते. आता मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत गेलेल्या लाखो मराठा आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी एक अध्यादेशाचा कागद दिला आणि मागण्या मान्य केल्याचे सांगितले.
यावर हर्षवर्धन जाधव म्हणाले 'मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाने आपला विजय झाल्याचे सांगत गुलाल उधळला आणि ते माघारी आले. पण मुळात मराठा समाजाची या सरकारने फसवणूक केली आहे. अध्यादेश काढणाऱ्या सरकारचा हेतू जर शुद्ध होता, प्रामाणिक होता, तर आंदोलन सुरू असतांना त्यांनी विशेष अधिवेशन का बोलावले नाही? ते बोलावले असते आणि त्यात मराठा समाजाला नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र व ओबीसींच्या सवलती देण्याचा कायदा मंजूर करून घेतला असता तर हे आरक्षण कोर्टातही टिकले असते.'
'पण नाक दाबल्यावर तोंड उघडले जाते तसा प्रकार याबाबतीत घडला आहे. अध्यादेशाचे रुपांतर सहा महिन्याच्या आत कायद्यात करावे लागते, ते झाले नाही तर मग गडबड आहे, अशी शंकाही हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी करणाऱ्या जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची भूमिका का घेतली? हेही समजत नाही.', असे म्हणत जाधव यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा दिल्लीतच सुटू शकतो, याचा पुनरुच्चार केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.