Chhatrapati Sambhajinagar News : महाविकास आघाडी कायम राहिली, तर ठाकरे गट लोकसभेला बाजी मारणार..

Shivsena : शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य आणि ग्रामीण मधील कन्नड, गंगापूर-खुल्ताबाद आणि वैजापूर अशा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे.
Shivsena Uddhav Thackeray News
Shivsena Uddhav Thackeray NewsSarkarnama

Marathwada : राज्यात नुकत्याच झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतून एक स्पष्ट संदेश गेला आहे. तो म्हणजे महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एकजूट अशीच कायम राहिली तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला मोठा धक्का बसू शकतो. कसबा हा भाजपचा गड आघाडीच्या एकजुटीने उद्धवस्त झाला. तर चिंचवडमध्ये बंडखोरांना घेतलेल्या मतांची गोळाबेरीज केली तर तिथे देखील आश्विनी जगताप यांचा सहानुभूतीच्या लाटेनंतरही पराभव अटळ होता.

Shivsena Uddhav Thackeray News
Chandrakant Khaire News : नामांतराला विरोध आहे, तर मग न्यायालयात जा, आंदोलनाची नौटंकी कशाला ?

एकंदरित राज्यात महाविकास आघाडीचा पर्याय लोक स्वीकारत आहेत, हेच यावरून स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन पक्षांची आघाडी कायम राहिली तर ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा उमेदवार येथे विजयी होण्याची दाट शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) चंद्रकांत खैरे यांचा ४ हजार ४९२ एवढ्या कमी मतांनी पराभव झाला होता. अपक्ष हर्षवर्धन जाधव यांनी २ लाख ८३ हजार ७९८ म्हणजेच तब्बल २३.६८ टक्के मते घेतली होती.

हिंदूमतांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फूट पडलेली असतांना देखील विजयी उमेदवार एमायएमचे इम्तियाज जलील व खैरे यांना मिळालेल्या मतांमध्ये खूपच कमी अंतर होते. काॅंग्रेसच्या सुभाष झांबड यांना ९१ हजार ७९० एवढी मते मिळाली होती. म्हणजे खैरे यांनी अपक्ष जाधव, एमआयएम वंचित आघाडीचे इम्तियाज जलील, काॅंग्रेस अशा तीन उमेदवारांना मतांमध्ये मोठी फूट पडून देखील चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे एमआयएमचा मिळालेला विजय हा फार मोठा होता असे मानण्याचे कारण नाही.

परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीला या प्रयोगानंतर राज्यातील ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये चांगले यश मिळाले होते. अडीच वर्ष कोरोनात गेल्यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रगती पुस्तकावर उत्तम असाच शेरा दिसला. अडीच वर्षानंतर शिवसेनेत झालेले बंड, त्यातून झालेली मोठी फूट आणि ४० आमदार गेल्याने ठाकरेंची शक्ती काहीशी क्षीण झाल्याचे चित्र होते.

परंतु या सगळ्यातून बाहेर पडत ठाकरेंनी नव्याने पक्ष बांधणी सुरू केली आहे. भाजपची केंद्रातील सत्ता आणि राज्यातील भाजप शिंदे आणि ४० आमदारांच्या पाठीशी उभी असल्यामुळे ठाकरे यांना महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ताकद सोबत ठेवावी लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर गेल्या ३० वर्षापासून हा शिवसेनेचा गड राहिलेला आहे. मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. चंद्रकांत खैरे तर सलग चारवेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते.

Shivsena Uddhav Thackeray News
Congrees-Ncp News : नामांतराच्या मुद्यावरून काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा गोंधळ, नेत्यांना भूमिका घेता येईना..

शहरातील पुर्व, पश्चिम, मध्य आणि ग्रामीण मधील कन्नड, गंगापूर-खुल्ताबाद आणि वैजापूर अशा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. महाविकास आघाडीतील काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा विचार केला तर ग्रामीण भागात या दोन्ही पक्षांचा चांगला प्रभाव आहे. शहरी भागात मात्र भाजप, ठाकरे व आता शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ पाहता या दोन्ही पक्षाचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला शहरी भागापेक्षा ग्रामीण ठिकाणी अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.

शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार हे बाहेर पडलेले आहेत. कन्नडचे उदयसिंह राजपूत हे एकमेव आमदार ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहेत. पाच आमदार गेल्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराला लोकसभेला जो फटका बसणार आहे, त्याची भरपाई महाविकास आघाडीतील काॅंग्रेस-राष्ट्रवादी हे घटक पक्ष, व प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी सोबत राहिली तर भरून काढू शकतील. शिवाय ठाकरे यांच्या शिवसेनेला जिल्ह्यात सहानुभूतीचा देखील मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

एकंदरित २०१९ मध्ये गमावलेला लोकसभा मतदारसंघ ठाकरे गट पुन्हा ताब्यात घेवू शकतो. शिंदे किंवा भाजपकडून कोण उमेदवार असेल हे स्पष्ट नसले तरी केंद्र आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर ते महाविकास आघाडीला रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार यात शंकाच नाही. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे खैरे, काॅग्रेसचे झांबड यांना मिळालेली मते यांचा विचार केला तर महाविकास आघाडीचे पारडे सध्या तरी या मतदारसंघात जड आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेसच्या नितीन पाटील यांना ३ लाख ५८ हजार ९०२ म्हणजेच ३६.५१ टक्के एवढी मते मिळाली होती.

त्याआधी म्हणजे २००९ च्या निवडणुकीत काॅंग्रेसच्याच उत्तमसिंग पवार यांना २ लाख २२ हजार ८८२ मते मिळाली होती. तेव्हा देखील खैरे यांच्याविरुद्ध शांतिगिरी महाराज यांनी १ लाख ४८ हजार एवढी मते घेतली होती. तरी देखील ३३ हजारांच्या मताधिक्याने शिवसेनेने ही जागा राखली होती. गेल्या निवडणुकीत केवळ जाधव यांच्या उमेदवारीने खैरेंना पराभव पत्करावा लागला होता. आता त्याच जाधवांनी खैरेंना पाठिंबा जाहीर केला आहे. अर्थात आता जाधव यांची उपद्रव शक्ती तेवढी राहिलेली नाही, त्यामुळे ठाकरे गट जो उमेदवार देईल त्याला महाविकास आघाडीचे भक्कम पाठबळ असेल तर ठाकरे गट पुन्हा हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्यात नक्कीच यशस्वी ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com