Imtiaz Jaleel On uddhav Thackeray : इम्तियाज जलील यांच्याकडून उद्धव ठाकरेंचे कौतुक! विरोधक म्हणतात दोघं एकत्र येणार..

AIMIM leader Imtiaz Jaleel praises Uddhav and Aditya Thackeray, sparking buzz about a possible MIM-Shiv Sena alliance. Opposition calls it surprising. : शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना टोकाचा विरोध करत एमआयएमने महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठवाड्यात आपले बस्तान बसवले.
Imitaz Jaleel-Uddhav And Aditya Thackeray News
Imitaz Jaleel-Uddhav And Aditya Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM-Shivsena UBT News : महाराष्ट्रात जातीचे राजकारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणले, असा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात केला. मात्र हा आरोप करतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मात्र जातीचे राजकारण करत नाही ते राज्याच्या विकासाचे राजकारण करतात, असे प्रशस्तीपत्र इम्तियाज जलील यांनी दिले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची कौतुक केल्यानंतर विरोधकांकडून आगामी काळात एमआयएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येणार, अशा चर्चा झडू लागल्या आहेत.

एमआयएमचा (AIMIM) महाराष्ट्रात प्रवेश झाल्यापासून त्यांनी हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत आपली वोट बँक निर्माण केली. गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असलेली मुस्लिम वोट बँक पळवण्याचे काम ओवेसी बंधूंनी महाराष्ट्रात आल्यानंतर केले. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना टोकाचा विरोध करत एमआयएमने महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठवाड्यात आपले बस्तान बसवले.

भाजपची 'बी टीम' असा शिक्का माथी असला तरी त्याची फारशी पर्वा न करता एमआयएमने स्थानिक स्वराज्य संस्था आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आमदार आणि खासदार निवडून आणत आपली ताकद दाखवून दिली. (Shivsena) शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरातच भगवा झेंडा खाली उतरवून एमआयएमचे निशान फडकवण्यात या पक्षाला यश आले आणि त्यांचा आत्मविश्वास कमालीचा बळावला. ओवेसी बंधू यांनीही संभाजीनगरवर लक्ष केंद्रित करत येथे संघटना वाढवण्यासाठी वाव असल्याचे हेरले.

Imitaz Jaleel-Uddhav And Aditya Thackeray News
Chhagan Bhujbal On Imtiaz Jaleel : इम्तियाज जलीलांचा 'टायमिंग' हुकतोय की जुळतोय? भुजबळ म्हणाले, 'त्यांनी कधी बाळासाहेबांसोबत...' (VIDEO)

हिरवा अन् भगवा एकत्र?

महापालिकेत 25 नगरसेवकांसह विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यश मिळाले नसले तरी विरोधकांना धडकी भरवणारी मतं घेत एमआयएमने भल्याभल्या पक्षांना घाम फोडला होता. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या राजकारणात विरोधी पक्षात असलेल्या एमआयएमला आपला महापौर खुर्चीवर बसवायचा आहे. मात्र एकट्याच्या बळावर ते शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हिरवा आणि भगवा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

Imitaz Jaleel-Uddhav And Aditya Thackeray News
Raj-Uddhav Thackeray Unity : राज-उद्धव ठाकरेंच्या ऐक्यासाठी परदेशात झळकला बॅनर, व्हिएतनाममध्ये दिला आगळावेगळा संदेश

शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यामार्फत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतल्याची चर्चा आहे. शिवसेनेला जातीयवादी पक्ष म्हणत मुस्लिमांची एकगठ्ठा मते आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे जातीयतेचे राजकारण करत नाही, असे म्हणत कौतुक केले. बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत, त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एमआयएम छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळे राजकीय समीकरण आणू पाहत आहे.

Imitaz Jaleel-Uddhav And Aditya Thackeray News
Imtiaz Jaleel-Ambadas Danve News : एमआयएम- उद्धवसेनेची वाढती जवळीकता महापालिका निवडणुकीत रंग दाखवणार!

संजय शिरसाट यांना घाई..

अर्थात त्याला पक्षफुटीनंतर शिवसेनेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएम आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना निवडणुकीआधी एकत्र येतील अशी शक्यता नसली तरी निवडणुकीनंतर सत्तेसाठी गणित जुळवताना हे दोन पक्ष सोबत येऊ शकतात, अशी चर्चा आहे. एमआयएम आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाढत असलेली जवळीक महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी आक्रमकपणे हल्ला चढवला आहे. शिरसाट यांनी मुलांच्या आणि पत्नीच्या नावे बेकायदेशीररित्या मालमत्ता, भूखंड, सरकारी जमीन खरेदी केल्याचा आरोप करत इम्तियाज यांनी त्यांची कोंडी केली आहे.

Imitaz Jaleel-Uddhav And Aditya Thackeray News
Sanjay Shirsat On Imtiaz Jaleel : संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचे आरोप हलक्यात घेतले; म्हणाले काहीही होणार नाही!

या मोहिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना रसद पुरवली जात असल्याचाही आरोप आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी 'उबाठा' आणि एमआयएम एकत्र येणार, असे विधान करायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएम यांची युती दोन्ही पक्षांना फायद्याची ठरते की मग त्यांना तोटा होतो? हे महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांवरून आणि नगरसेवकांच्या संख्येवरून स्पष्ट होईल. तूर्तास एमआयएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सुरू असलेल्या 'मिले सुर मेरा तुम्हारा'ने महायुतीच्या पोटात मात्र गोळा उठला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com