Shivsena-Aimim News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेंद्रा एमआयडीसीतील भूखंड, व्हिट्स हॉटेलचे प्रकरण आणि त्यानंतर आता शहरासह लगतच्या भागात सरकारी जमीन, प्लॉट बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचे आरोप करत इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली.
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आपले काहीही होणार नाही, असा दावा करत आरोप फेटाळले आहेत. इम्तियाज जलील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन संजय शिरसाट व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे कुठे आणि किती एकर जमीन, भूखंड प्लॉट, खरेदी करण्यात आले आहेत याचे कागदोपत्री पुरावे सादर केले होते. आज या सगळ्या कागदपत्रांची फाईल घेऊन त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचीही त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली.
एवढ्यावरच न थांबता इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने आपण विविध प्रसार माध्यमात मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्री अथवा अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्यास त्याच्याविरोधात सबळ पुरावे आपल्याकडे सादर करण्याचे आवाहन केले होते. त्या पुराव्याआधारे आपण उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे जबाबदारीने म्हटले होते.
त्या अनुषंगाने आपल्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून अनेक भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्याविरोधात शासनाच्या संबंधित विभागाकडून योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी, याकरिता मला सर्व पुरावे आपल्याकडे सादर करण्यासाठी आपला वेळ हवा आहे. आपणास नम्र विनंती आहे की उपरोक्त नमूद केलेल्या बाबी गंभीर स्वरूपाच्या असून त्याकरता आपण आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य करावे, असे या पत्रात नमूद केले आहे. असेच पत्र इम्तियाज जलील यांनी राज्यपालांनाही पाठवले आहे.
संजय शिरसाट यांच्यावर बेकायदेशीर मालमत्ता खरेदी आणि सरकारी जमीन, एमआयडीसीतील भूखंड खरेदी करण्यासाठी राजकीय दबाव आणल्याचा आरोप केल्यानंतर संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी काल इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक करण्याचा प्रयत्न केला होता. इम्तियाज जलील हे संजय शिरसाट यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. या शेणफेक आंदोलनासाठी आलेल्या जालन्यातील शिरसाट समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र या प्रकारानंतर इम्तियाज जलील अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्याची तयारी चालवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.