Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या जालना मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार अर्जून खोतकर यांच्या विरोधातील बंडखोरी कायम आहे. परंतु केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधु भास्कर दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने खोतकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे भाजपचेच महानगराध्यक्ष मकरंद पांगारकर यांनी मात्र बंडखोरी केली आहे. त्यामुळे जालन्यामध्ये अर्जून खोतकर यांच्यासाठी `कही खुशी कही गम`, असे वातावरण आहे.
भास्कर दानवे यांनी माघार घेतली नसती तर मात्र अर्जून खोतकर यांना ही निवडणूक जड गेली असती, असे बोलले जाते. (Jalna) महायुतीत भाजपची बंडखोरी झाली असताना तिकेड महाविकास आघाडीत जालन्यासह जिल्ह्याच्या अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. जालना, परतूर आणि घनसावंगीत बहुरंगी, तर बदनापूर, भोकरदन मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, जिल्हातील पाच विधानसभा मतदार संघात 109 उमेदवार रिंगणात आहेत.
जालन्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार व उमदेवार कैलास गोरंट्याल यांच्याविरोधात काँग्रेसचे नेते अब्दुल हाफिस यांनी बंडखोरी केली आहे. जालना विधासभा मतदारसंघात भाजपच्या भास्कर दानवे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून याची चर्चा मराठवाड्यात होती. भास्कर दानवे यांच्या उमेदवारी मागे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे असल्याचे बोलले जात होते.
सहा महिन्यापुर्वी झालेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवसेनेचे उपनेते अर्जून खोतकर यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची परतफेड करणार अशी चर्चा होती. भास्कर दानवे यांनी खोतकर यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी अर्जून खोतकर यांच्यावर डाव टाकल्याची चर्चा होती.
परंतु राज्यात महायुती विधानसभा निवडणुक एकत्रित लढवत असल्याने आणि भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघात मुलगा आमदार संतोष दानवे, कन्नड मतदारसंघात कन्या संजना जाधव यांना जालन्यातील बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी रावसाहेब दानवे यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे दिसते. भाजपचे महानगराध्यक्ष मकरंद पांगरकर यांनी बंडखोरी केली असली तरी त्यांची उपद्रव शक्ती खोतकर यांना फार अडचणीची ठरणार नाही.
भास्कर दानवे यांच्या माघारीनंतर अर्जून खोतकर यांचा खडतर मार्ग काहीसा सुकर होण्याची चिन्हे आहेत. भास्कर दानवे यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांपर्यंत काय मेसेज पोहचवला जातो, यावर महायुतीच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.