
Maharashtra BJP News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 11 वर्षाच्या कार्यकाळात भारताने केलेल्या प्रगतीचा प्रचार सध्या भाजपाकडून जोरात सुरू आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आत्मनिर्भर झाला. कधी काळी खरेदीदार अशी ओळख असलेला आपला देश आता उत्पादक आणि निर्यातदार झाल्याचे श्रेय मोदींनाचा जाते, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचे कौतुक केले.
अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या सोशल मिडिया हॅन्डलवरून पंतप्रधान मोदी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत बदलत्या आणि आत्मनिर्भर भारताची वस्तुस्थिती मांडली. पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीत भारताच्या संरक्षण क्षेत्रात झालेले निर्णय आणि त्यातून झालेल्या उपलब्धींचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
2014 मध्ये भारताची संरक्षण निर्यात केवळ 1941 कोटी होती, ती 2024 मध्ये 23662 कोटींवर पोहोचली, म्हणजेच जवळपास 12 पटींनी वाढली. (PM Modi) भारतीय संरक्षण उत्पादने आता 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात होत असून, 'आत्मनिर्भर भारत'खरेदीदारापासून उत्पादक आणि निर्यातदार देश बनला आहे. 117 हून अधिक कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित संरक्षण प्रकल्प सुरू झाले, ज्यामुळे देखरेख, अचूकता आणि रिअल-टाइम निर्णयक्षमता बळकट झाली आहे.
31 MQ-9B ड्रोनद्वारे भारताच्या सीमा आणि किनारपट्टीवर 24x7 सतर्कता सुनिश्चित केली गेली आहे. IDEX आणि ADITI उपक्रमांद्वारे 1000 हून अधिक स्टार्टअप्सच्या नवप्रवर्तनांची युद्धभूमीवर चाचणी घेण्यात आली, ज्यामुळे स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना मिळाली. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रकल्पांना गती मिळाली, ज्यामुळे स्थानिक उद्योजक आणि उत्पादकांना संधी प्राप्त झाल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला.
गेल्या चार-पाच वर्षांत संरक्षण आयात 21% ने कमी झाली असून, भारत आता मोठ्या प्रमाणावर निर्यातदार बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तेजस लढाऊ विमान, अर्जुन टँक, आयएनएस विक्रांत यांसारख्या स्वदेशी प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले. तसेच, डीआरडीओ आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने मिसाइल्स, ड्रोन आणि इतर प्रगत तंत्रज्ञान विकसित केले गेले.
देशात संरक्षण कॉरिडॉर स्थापन झाले, ज्यामुळे स्थानिक उद्योजक आणि उत्पादनाला प्रोत्साहन मिळाले. संरक्षण क्षेत्राच्या गरजेनुसार सीमावर्ती भागांत आणि देशांतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला. नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढा पुकारून त्याचे मोठ्या प्रमाणावर निर्मूलन झाले आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतात हिंसाचार 70% कमी झाला, नागरी मृत्यूंमध्ये 89% घट झाली, तसेच 10,500 हून अधिक बंडखोरांनी शस्त्रे टाकून मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
'ऑपरेशन वंदे भारत'द्वारे 30 लाखांहून अधिक भारतीयांना संकटकाळात तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय संकल्पाच्या बळावर सुरक्षितपणे घरी आणले गेले. 2023-24 मध्ये सुदानमधून 4,097 नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी'द्वारे, तर इस्रायलमधून 1,309 नागरिकांना 'ऑपरेशन अजय'द्वारे वाचवण्यात आले. कोविड-19 काळात 'ऑपरेशन गंगा'अंतर्गत 22,600 हून अधिक भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणले गेल्याचा उल्लेखही अशोक चव्हाण यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.