Jalna BJP News: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जुलै महिन्यात जाहीर केल्या. जालना जिल्ह्यातील नियुक्त्यांवरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यात वाद असल्याने ग्रामीण जिल्हाध्यक्षाची निवड झाली असली तरी अद्याप शहराध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नव्हती. या कार्यकारिणी निवडीला अखेर मंगळवारी मुहूर्त सापडला. या कार्यकारिणीतून लोणीकर गटाला वगळण्यात आले असून, दानवे गटाचे वर्चस्व आहे.
जालना जिल्ह्यासाठी दानवे-लोणीकर हा वाद नवा नाही. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदावरून देखील यापूर्वी या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला होता. संधी मिळेल तेव्हा हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत.
पक्षश्रेष्ठीचेदेखील दुर्लक्ष
जालना जिल्ह्यात भाजप कार्यकारिणी निवडीवरून गेल्या पाच वर्षांपासून दानवे-लोणीकर गटात संघर्ष सुरू आहे. दोघांनीही दोन स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर केल्या होत्या. दानवे व लोणीकर एकमेकांवर जाहीर टीका करणे टाळत असले तरी त्यांच्यात संवाद नाही. एका व्यासपीठावर येण्याचेदेखील हे दोघे कायम टाळत आले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठीदेखील याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही.
कार्यकारिणी निवडीची बैठक लोणीकर पिता-पुत्रांना वगळून
जालना जिल्हा कार्यकारिणी निवडीच्या बैठकीला माजी मंत्री बबनराव लोणीकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या गैरहजेरीत ही बैठक पार पडली. या दोघांना बैठकीचे निमंत्रणच नसल्याचे समजते. त्यामुळे या दोन्ही गटांतील वाद पुन्हा यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
शहराध्यक्ष पदाचे भिजत घोंगड कायम
जिल्हा कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असली तरी अद्याप जालना शहराध्यक्ष पदाचे भिजत घोंगडे कायम आहे. जालना शहराध्यक्ष हा महानगरपालिका क्षेत्र असल्यामुळे भावी पहिला महापौर पदाचा उमेदवार असणार आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक अशोक पांगारकर यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, भास्कर दानवे हे महापौर पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. जालना विधानसभेची जागा भाजपच्या हिश्याला आली तर भास्कर दानवे हेच आघाडीवरचे नाव आहे. अशा स्वरूपाची एकूण राजकीय गोळाबेरीज करण्याचे रावसाहेब दानवेंचे प्रयत्न आहेत.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बद्रिनाथ पठाडे यांची निवड जाहीर झाली. भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी भास्कर पाटील दानवे, कैलास उबाळे, परसराम तळेकर, वसंतराव जगताप, एकनाथ मोरे, राजेश चव्हाण, तुळशीराम पायगन, वैशाली गवळी, राजेंद्र देशमुख, गणेश खवणे, कैलास चव्हाण, हरिनाम साने, विश्वजीत खरात, शिवाजी मोरे, जितेंद्र पालकर, दीपक ठाकूर, अरुण उपाध्याय, धनराज कबीर, बबनराव शिरसाट, सुधाकर खरात यांच्या निवडीची घोषणा केली.
जिल्हा सरचिटणीसपदी सिद्धिविनायक मुळे, देविदास कुचे, रमेश भापकर, आशाताई माळी, अतिक खान यांची वर्णी लागली तर जिल्हा चिटणीसपदी परमेश्वर लेंबे, रामेश्वर माने, विठ्ठल चिंचपुरे यांची निवड केली. जिल्हा कोशाध्यक्षपदी सुपडसिंग जिगरवाल यांची तर भाजप जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी संध्या देठे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी भागवत बावणे, भाजप अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्षपदी खलील शेख, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी कपिल दहेकर, भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अनिल सरकटे, भाजप अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्षपदी गणेश इंगळे यांची नियुक्ती केली.
(Edited by Sachin Waghmare)