Jalna News : मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अगदी महायुतीच्या हमखास निवडून येण्याचा दावा झालेल्या मतदारसंघात आता चुरस असल्याचे समोर येत आहे. यापैकीच एक म्हणजे सलग पाचवेळा विजय मिळवलेले आणि सहाव्यांदा निवडणूक रिंगणात असलेले विद्यमान खासदार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना मतदारसंघ.
गेली पंचवीस वर्ष या मतदारसंघात दानवे यांच्या नेतृत्वात भाजपची एकहाती सत्ता राहिली आहे. त्यामुळेच भाजपने (Bjp) सहाव्यांदा दानवे (Raosaheb Danve) यांना उमेदवारी देत षटकाराची संधी उपलब्ध करून दिली. पण महाविकास आघाडीने (MVA) जालन्यात असा काही डाव टाकला, की एकतर्फी वाटणारी जालना लोकसभेची निवडणूक चुरशीची नाही तर भाजपच्या गोटात टेन्शन निर्माण करणारी ठरली आहे.
2009 मध्ये रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढलेल्या आणि अवघ्या आठ हजार मतांनी पराभूत झालेल्या माजी आमदार कल्याण काळे यांच्यावर काँग्रेसने पुन्हा एकदा जबाबदारी टाकली. मराठवाड्यातील राजकीय परिस्थिती, मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून झालेले मतांचे ध्रुवीकरण या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करत काँग्रेसने काळे यांची निवड केली.
13 मे रोजी या मतदारसंघात 70 टक्के मतदान पार पडल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी आकडेमोड करण्यात आली. यातून समोर आलेले चित्र रावसाहेब दानवे यांची चिंता वाढवणारे, तर काळे यांना दिलासा देणारे असल्याचे बोलले जाते. मराठा आरक्षणाच्या विरोधातील समाजाचा राग मतपेटीतून व्यक्त झाल्याची चर्चा आहे.
त्याशिवाय दानवे यांना मित्र पक्षांनी दगा दिल्याचेही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मतदारसंघाचा दौरा सुरू केला. आभार दौरा असे नाव देत काळे यांनी संपुर्ण जालना जिल्हा पिंजून काढत मतदानाचा आढावा बुथ कार्यकर्त्यांकडून घेतला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गावागावत काळे यांच्या या आभार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. दुसरीकडे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी शेवटच्या टप्प्यातील उमेदवारांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. प्रचार संपल्यानंतर शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर असे देवदर्शन केल्यानंतर दानवे मतदारसंघात रमले आहेत.
एकीकडे महायुतीची आकडेमोड सुरू आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कल्याण काळेंचा आभार दौरा. दानवेंची चिंता आणि काळेचा उत्साह पाहता काँग्रस जालना मतदारसंघात चाळीस वर्षानंतर कमबॅक करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(Edited By : Sachin Waghmare)