Jalna Muncipal Corporatioan Result : जालना महापालिकेवर पहिला महापौर भाजपचाच बसेल असा दावा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करताना वरिष्ठ नेत्यांना दिला होता. शिवसेनेसोबत युती नको अशी भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी घेतली होती. अखेर घडलेही तसेच भाजप-शिवसेना हे दोघे महापालिकेत स्वबळावर लढले. भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल आणि महानगरप्रमुख भास्कर दानवे या त्रिकुटाने शिंदे सेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचा करेक्ट कार्यक्रम केला.
नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने 65 पैकी 41 जागा जिंकत बहुमत पटकावले. आता सत्ता स्थापनेसाठी त्यांना शिवसेनेच्या कुबड्यांचीही गरज उरली नाही. अर्जुन खोतकर यांना अतिआत्मविश्वास नडल्याचे आता बोलले जात आहे. निवडणुकीआधीच महापौर पदाचा उमेदवार जाहीर करणे, युती होत नाही हे दिसत असताना तिसऱ्या आघाडीचा घाट घालत वापरलेले दबावतंत्र पुढे खोतकर यांच्यावरच उलटले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दानवे-गोरंट्याल जोडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टेही काढले आहे.
जालना महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल व त्यांच्या समर्थकांना तिकीट वाटपात योग्य सन्मान देण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे होते. युतीचे गुऱ्हाळ शेवटच्या क्षणापर्यंत चालले आणि मग युती तुटली. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांना एबी फाॅर्म देताना दानवे-गोरंट्याल-भास्कर दानवे यांची दमछाक उडाली. काही प्रमाणात नाराजी नाट्यही घडले. परंतु या नाराजीचा फटका बसणार नाही याची काळजीही नेत्यांनी घेतली. घराणेशाहीला झुकते माप दिले पण मतदारांनी त्यावरही शिक्कामोर्तब केले. भास्कर दानवे, त्यांच्या पत्नी, कैलास गोरंट्याल यांचा मुलगा हे विजयी झाले.
रावसाहेब दानवे यांनी प्रचार सभांमधून पाच टर्म खासदार, दोनवेळा केंद्रात राज्यमंत्री असताना मतदारसंघ आणि जालन्याचा केलेला विकास याची जंत्री मतदारांसमोर मांडली. लोकसभा निवडणुकीत आपला पराभव केल्यानंतर विकास कामे रखडली,काँग्रेसच्या विद्यमान खासदाराला निधी आणता येत नाहीये, हे दानवे यांनी पटवून सांगितले. शिवसेनेवर फारशी टीका न करता भाजपचा रोख काँग्रेसवरच दिसला. मतदारांनीही शहराच्या पाणी, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा या सगळ्या गोष्टींचा विचार करत भाजपच्या पारड्यात मतांचे दान मोठ्या प्रमाणात टाकले.
विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यापासून शिवसेनेचे उपनेते तथा जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर कमालीचे ओव्हर काॅन्फीडंसमध्ये होते. पाचशे कोटीहून अधिक निधी शहरासाठी आणल्यामुळे जालनेकरांची साथ आपल्यालाच मिळेल असा त्यांचा दावा होता. भास्कर आंबेकर त्यांच्या साथीला आले तरी निर्णय प्रक्रियेत फक्त खोतकर यांचाच शब्द अंतिम होता.
निवडणुकी आधीच महापौर पदासाठी विष्णू पाचफुले यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे युती तुटण्यात हा महत्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरला होता. मुलगी दर्शना हिला उमेदवारी देत निवडून आणत खोतकरांनी आपली प्रतिष्ठा राखली. परंतु जालना महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवण्याचे खोतकर यांचे स्वप्न भंगले आहे.
लोकसभा निवडणुकीत पाच टर्म खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्याचा मोठा पराक्रम करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मात्र या निवडणुकीत प्रभाव दाखवता आला नाही. खासदार कल्याण काळे यांनी जालन्यात लक्ष घातले. प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना आणून वातावरण निर्मितीही केली. पण रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभांमधून कल्याण काळेंना निवडून देऊन जालनेकरांनो सांगा तुमचे काय कल्याण झाले? हा मुद्दा चांगलाच प्रभावी ठरला. त्यामुळे काँग्रेसला 9 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण, पैशाचा वारेमाप वापर हे मुद्दे प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोचवण्यात काँग्रेसचे नेते अपयशी ठरले.
जालना महापालिका निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, एमआयएम, वंचित आघाडी हे पक्ष प्रभाव दाखवू शकले नाही. शिवसेना-भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत जालन्यात झाली. अखेर भाजपने बहुमत पटकावत मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांना चारीमुंड्या चित करत शतप्रतिशत कमळ फुलवले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.