Marathwada Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ आॅगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू झाले. १ सप्टेंबरला या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या. (Manoj Jarange Patil Meeting News) यात आंदोलकांसह अनेक पोलिस कर्मचारी, महिलाही जखमी झाल्या. पण या घटनेमुळे अंतरवाली सराटीपुरते मर्यादित हे आंदोलन राज्यभरात पसरले.
वाढता पाठिंबा आणि राज्यभरातून आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी यामुळे जरांगे यांचे उपोषण सतरा दिवस चालले. दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्र्यांचे शिष्टमंडळ तीन-चार वेळा अंतरवालीत येऊन गेले. (Maratha Reservation) पण मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसींना मिळणाऱ्या सवलती यावर जरांगे आणि त्यांचे सहकारी ठाम राहिले. कोंडी फुटत नसताना (Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांनी थेट अंतरवाली गाठत जरांगेची समजूत काढली.
महिनाभरात नवा जीआर काढून मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र आणि आरक्षण देण्याचा शब्द दिला आणि सतराव्या दिवशी जरांगेंनी उपोषण मागे घेत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. (Marathwada) सरकारने लढाई जिंकली असे वाटत असताना छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ठणठणीत झालेल्या जरांगे यांनी नव्या लढ्याची तयारी सुरू केली. राज्यात जिथे जिथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी भेट देण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली.
या दौऱ्याला सुरुवात झाली आणि आज मराठवाड्यातील अनेक भागात त्यांच्या बैठकांना जाहीर सभांचे स्वरूप प्राप्त झाले. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा निर्धार जरांगे ठिकठिकाणी व्यक्त करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घरावर तुळशी पत्र ठेवून मैदानात उतरलेल्या जरांगे यांच्यावर समाजाचा विश्वास असल्याचे त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे.
सतराव्या दिवशी उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे यांचे आंदोलन गुंडाळले असा गैरसमज समाजामध्ये पसरू नये, याची पुरेपूर काळजी जरांगे स्वतः आणि त्यांचे शिष्टमंडळ घेताना दिसत आहे. १४ आॅक्टोबर रोजी जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने सरकारला दिलेली एक महिन्याची मुदत संपत आहे. त्याच दिवशी अंतरवाली सराटीत शंभर एकर जागेवर भव्य सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जरांगे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याकडे पाहिले जाते.
अंतरवाली सराटीच्या सभेनंतरही सरकारला अतिरिक्त दहा दिवस देण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. हे दहा दिवस पूर्ण झाल्यानंतरही जर सरकारने सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा जीआर काढला नाही, तर मात्र राज्यात मोठे आंदोलन उभे करण्याची तयारी जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सरकारने जरांगे यांचे उपोषण मागे घ्यायला लावले असले तरी आजचे मरण उद्यावर लोटल्यासारखेच ठरू नये.
दरम्यानच्या काळात सरकार आणि त्यांनी नेमलेली समिती आपल्याला काहीच माहिती देत नसल्याची नाराजी जरांगे यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे सरकार १४ आॅक्टोबरच्या सभेआधीच जरांगेच्या मागणीनुसार सुधारित जीआर काढणार? की मग मराठवाडा आणि राज्याला पुन्हा मोठ्या आंदोलनाच्या संकटात लोटणार हे लवकरच स्पष्ट होईल.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.