Kohlapur News : महाराष्ट्रात महिनाभरात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. आम्ही शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून 60 ते 62 मतदारसंघात जाऊन आलो आहोत. याच ठिकाणी 5 वर्षांपूर्वी ज्यांचा निसटता विजय झाला त्यांना उमेदवारी दिली होती. संध्यादेवी कुपेकर यांनी उमेदवारी नाकारली म्हणून त्यांना उमेदवारी द्यायची वेळ आली होती. मात्र, त्यांनी पक्षाची साथ सोडली आणि पलिकडच्या बाजूला जाऊन बसले आहेत.
येत्या काळात चंदगड विधानसभा मतदारसंघात नवा चेहरा मैदानात उतरविण्यात येणार असून तरुणांना संधी देऊन महाराष्ट्रात जास्तीत जास्त तुतारीचे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्पष्ट केले.
चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव-स्वराज्य यात्रेचे रविवारी आगमन झाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, हे आमदार पुढे निधीचे गणित मांडत असतात. त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते टक्केवारीची गणित करत असतात. शरद पवार यांनी ठरवलं की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून नवीन चेहरा द्यायचा आहे. त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे.
बाबा मला म्हणायचे प्रतापराव गुर्जर यांच्या स्मारकाचं दर्शन झालं की पुढं सगळं चांगलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला तसा अनेक ठिकाणी भ्रष्टाचार करून तो पैसा निवडणुकीत वापरला जातो. आता विधानसभेला देखील तसंच होऊ शकते. महाराष्ट्रात आपल्या बहिणी सुरक्षित नाहीत. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महाराष्ट्रात 2024 साली 50 हजार गुन्हे महिला अत्याचाराचे दाखल झाले आहेत. पण राज्याचे गृहमंत्री याचे समर्थन करतात. अनेक गुन्हे दाखल असलेले लोकं सोबत ठेवतात, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
ठाण्यात कुठल्याच हॉटेलमध्ये गेल्यावर बिल द्यायची सवय नसल्याने दाओसमध्ये देखील त्यांनी तसेच केले आहे. पण हॉटेलचे तिथले बिल इथे येतं हे भूषणावह नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही योजना बळकट करण्याचे काम करणार आहोत. जे पैसे देतात ते सरकारी तिजोरीतील आहेत. त्यांच्या खिशातील नाहीत. सर्व योजनांचे पैसे इकडे वळवण्याचे काम हे सरकार करत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.
कंत्राटदार आत्महत्येचं पाऊल उचलतील
लोकसभेआधी ताट होते पण लोकसभेत पराभूत झाल्यावर त्यांनी तिजोरी उघडली. पण राज्याच्या डोक्यावर मोठं कर्ज करून हे बहाद्दर सत्तेतून जातील. महाराष्ट्रातील कंत्राटदार आत्महत्येचं पाऊल उचलतील. कारण त्यांना पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत एक दिलाने काम करावे लागणार आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
तुतारी वाजवणाऱ्याचं वजन महाराष्ट्रात वाढलं
पुढच्या 8 ते 10 दिवसात उमेदवार जाहीर होतील. या मतदार संघातील अनेकांना आमदार व्हायची इच्छा आहे. पण तुम्ही सगळे एक झाला तर येथे आपण विजयी होऊ शकतो. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन महाराष्ट्रात वाढलं आहे. एक दिवस असा होता की ऑफिसमध्ये माणूस होता. पण आता पक्षात येण्यासाठी रिघ लागली आहे. एकदा तुतारी वाजावयला लागली की थांबत नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.