
Parbhani : प्रशासनावर पकड, नियम, कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारे आणि सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे जिल्ह्याचे भूमिपुत्र विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी घेतलेली स्वेच्छा निवृत्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Sunil Kendrekar News) निवृत्तीनंतरही हा शिस्तप्रिय अधिकारी शांत बसणाऱ्यापैकी नसून निश्चितच समाजाच्या भल्यासाठी झटत राहील, असा परभणीकरांना विश्वास आहे. आपल्या पदाचा, अधिकाराचा सर्वसामान्यांच्या हितासाठी वापर करणाऱ्या, प्रसंगी यंत्रणेशी लढणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये केंद्रेकर यांचा समावेश होतो.
एक अभियांत्रिकी प्राध्यापक, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशी पदे भूषविल्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. (Parbhani) प्रशासकीय सेवेत त्यांनी जिल्हाधिकारी, विक्रीकर आयुक्त, कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक व शेवटी विभागीय आयुक्त अशा सर्व क्षेत्रात काम केले. (Marathwada) अशा दांडगा अनुभव असलेल्या केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीने जिल्ह्यात व मराठवाड्यात चर्चेला सुरुवात झाली आहे.
दोन वर्षापुर्वीच आपल्या मित्र परिवारात स्वेच्छा निवृत्तीचे सुतोवाच केंद्रेकरांनी केले होते. त्यामुळे कुणाच्या दबावामुळे हा अधिकारी स्वेच्छा निवृत्ती घेईल, हे काही पटत नाही. (commissioner) शहरापासून जवळच असलेल्या झरी गावचे मुळ निवासी असलेले केंद्रेकर यांचे बालपण व शिक्षण परभणीतच झाले. वडील मधुकरराव केंद्रेकर हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते तर आई गृहीणी. पहिली ते दहावी पर्यंत येथील बाल विद्या मंदिरात शिक्षण झाल्यानंतर शिवाजी महाविद्यालयात अकरावी व बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतले.
त्यानंतर औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये पदवी प्राप्त केली व स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागले. दरम्यान एका अॅटो कंपनीत काम केले. तसेच एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून देखील अध्यापनाचे कार्य केले आहे. केंद्रकर यांना शेती व व्यायामाची प्रचंड आवड आहे. विद्यार्थी दशेपासून आजतागायत त्यांनी व्यायामाचा शिरस्ता अभावानेच मोडल्याचे सांगीतले जाते. त्यामुळे या वयातही त्यांचे फिजीकल फिटनेस युवकांना लाजवणारे आहे.
दररोज धावणे यासह अन्य व्यायाम प्रकार, ध्यान धारणेसाठी ते जाणीवपुर्वक वेळ देतात. शेतीची व विशेषतः शेतात काम कऱण्याची त्यांना विशेष आवड. झरी येथील आपल्या शेतात ते काम करीत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याच बरोबर शेतीमध्ये विविध प्रयोग करणारा प्रयोगशिल शेतकरी देखील त्यांच्यात दडला आहे. शेती, आरोग्य, क्रीडा या विषयाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. भविष्यात आपण शेतीकडेच विशेष लक्ष देऊ असे देखील ते सांगतात. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर का होईना जिल्ह्याचा हा कर्तव्यदक्ष भूमिपुत्र परभणीकरांना पूर्णवेळ उपलब्ध होईल, अशा सर्वसामान्यांना अपेक्षा आहेत.
केंद्रेकर यांनी नेहमीच आपल्या पदाला व अधिकाराला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी असतांना त्यांची कारकिर्द गाजली. त्यांची बदली झाल्यानंतर लोकांनी केलेले उठाव राज्यभर गाजला. शासनाला देखील त्यांची बदली रद्द करावी लागली होती. असे हे अधिकारी राज्यात कुठेही असले तरी आपल्या जन्मभूमीला मात्र कधी विसरले नाहीत. विभागीय आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यानंतर तर परभणी जिल्हा त्यांच्या अधिकार क्षेत्रात आला.
शहराच्या पाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार योजना मार्गी लावण्यात, क्रीडा संकुलासाठी कृषी विद्यापीठाची जागा मिळवून देण्यासह अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील त्यांना प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केल्याचे सांगीतले जाते. परभणी मनपाचे तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार, तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांना त्यांनी अनेकवेळा मार्गदर्शन केले. शेतात काम करतांनाचे, खांद्यावर पिशवी टाकून भाजीपाला खरेदी करीत असल्याचे त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. माननीय, सर म्हणू नका अशी त्यांची भूमिका होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.