Kesharbai Kshirsagar News : केशरबाई क्षीरसागरांचा मुत्सद्दीपणा अन् करारी बाणा; दिग्गजांशी दोन हात करत निर्माण केलं स्वत:चं अस्तित्व...

Beed Politics : तीन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत एकदा आमदार आणि तीन वेळा खासदार..
Kesharbai Kshirsagar News
Kesharbai Kshirsagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : गावाचा सरपंच ते तीन वेळा खासदार व्हाया थेट सभापती असा प्रवास करणाऱ्या दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांना आयुष्यात अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले असले तरी मुत्सद्दीपणा आणि करारी बाणा त्यांनी कधी सोडला नाही. याच बळावर त्यांनी जिल्ह्यातील दिग्गजांशी दोन हात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा लेखन प्रपंच. (Latest Marathi News)

ऐंशीच्या दशकात इंदिरा काँग्रेसची स्थापना झाली. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच असा जिल्ह्यातील तत्कालीन मातब्बर नेत्यांचा होरा होता. राजकीय परिस्थितीही तशीच होती. पण, केशरबाई क्षीरसागर यांनी चाणाक्ष खेळी करत दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्यामार्फत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भेट घेतली आणि लोकसभेची उमेदवारी मिळविली. जिल्ह्यातील तत्कालीन मातब्बर नेत्यांसाठी हा मोठा राजकीय धक्का तर ठरलाच. शिवाय येथूनच जिल्ह्याच्या राजकारणात केशरबाई क्षीरसागर नावाचे नवे पर्व सुरू झाले.

Kesharbai Kshirsagar News
Devendra Fadnavis News : शिवसेना-राष्ट्रवादी आपल्या सोबत तरी 'भाजपच बॉस'; फडणवीसांच्या वक्तव्याने खळबळ माजणार ?

तीन दशकांच्या राजकीय कारकिर्दीत एकदा आमदार आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या केशरबाई क्षीरसागर यांना आपल्या सामाजिक- राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहावे लागले, संघर्ष करावा लागला, मात्र त्यांनी जिल्ह्यातील कुणाला नेता मानले नाही, हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आणि वेगळेपण म्हणावे लागेल.

कुठलीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या आणि अति अल्पसंख्याक मानल्या जाणार्‍या तेली कुटुंबाच्या सून असलेल्या केशरबाई क्षीरसागर कुठलेही आरक्षण नसताना प्रथम बीड तालुक्यातील नावगण राजुरी गावच्या सरपंच झाल्या. तिथेही त्यांना राजकीय संघर्ष करावाच लागला. नंतर पंचायत समिती सभापती आणि मग खासदार, आमदार असा त्यांचा प्रवास राहिला. जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांशी संघर्ष ठरलेलाच असल्याने देश आणि राज्य पातळीवरील नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवायचे हे सूत्र त्यांनी जपले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, नरसिंहराव, सीताराम केसरी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, ए. आर. अंतुले, दिवंगत शिला दीक्षित, अस्लम शेरखान, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे, सुशीलकुमार शिंदे अशी अनेक नावे यामध्ये घेता येतील.

केशरबाई क्षीरसागर पराभवाने कधी खचल्या नाहीत. बबनराव ढाकणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला तर पुत्र जयदत्त क्षीरसागरदेखील विधानसभेला पराभूत झाले. याच काळात दुसरे पुत्र डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे नगराध्यक्षपद तांत्रिक कारणांनी रद्द झाले. जिल्ह्याच्या राजकारणावर हुकमत गाजविणाऱ्या क्षीरसागरांच्या घरातील सर्वच राजकीय पदे गेल्याने आता क्षीरसागरांचे राजकारण संपले, असे आडाखे त्यांचे विरोधक बांधत होते. पण, भूविकास बँकेच्या निवडणुकीत सर्व विरोधक एक असताना त्यांनी एकतर्फी विजय मिळवून मुलगा जयदत्त क्षीरसागर यांना अध्यक्ष केले. पुढच्या निवडणुकांत पुन्हा त्यांच्या घरात खासदार, आमदार, नगराध्यक्ष ही पदे आली.

Kesharbai Kshirsagar News
Ramdas Athawale News : आजही बाबासाहेबांच्या 'रिपब्लिकन' पक्षाचे नाव कायम ठेवले...; आठवलेंचा निशाणा कुणावर ?

केशरबाईंबद्दल ज्येष्ठ समकालीन पत्रकार अशोक देशमुख म्हणतात, केशरकाकू म्हणतील तेच तोरण आणि त्या म्हणतील तेच धोरण अशी परिस्थिती त्या काळात होती. जिल्ह्याच्या कोणत्याही कोपर्‍यात घडलेली घटना त्यांच्या कानावर असे. गावात काहीही समस्या निर्माण झाली की, गाव पुढारी काकूंकडे येत असत. आलेल्या माणसाला सन्मानाने वागवणे आणि त्याचे गाऱ्हाणे ऐकून घेणे हे त्यांनी नेहमीच पाळले.

Kesharbai Kshirsagar News
Ramdas Athawale News : 'माझ्या कामाला आला स्पीड; कारण माझ्या पाठीशी उभा होता मुंडेंचा बीड'

बीडला आकाशवाणी केंद्र व्हावे ही मागणी सर्वप्रथम त्यांनी केली आणि ती मंजूर झाली. जिल्ह्यासाठी दूरदर्शन केंद्राची मागणीही त्यांनी केली होती, अंबाजोगाई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झाले. परळी नगर रेल्वेमार्गाचे सूतोवाचही त्यांनीच केले व त्यासाठी अनेक वेळा शिष्टमंडळ घेऊन गेल्या, असेही देशमुख म्हणाले.

त्यांच्या काळात महाराष्ट्रात बोटावर मोजण्या एवढ्या महिला राजकारणात होत्या. काँग्रेसमध्ये प्रतिभा पाटील, प्रभाराव, शालिनी पाटील, विरोधी पक्षात मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर या महिला होत्या. गजानन सहकारी साखर कारखाना हा महिला अध्यक्ष असलेला पहिला साखर कारखाना. वसंतदादा पाटील आणि ए.आर.अंतुले यांनी सहकार्य केल्यामुळेच मार्गी लागला.

ज्येष्ठ समकालीन पत्रकार जगदीश पिंगळे म्हणतात, त्या काळात त्या न्यूजमेकर आणि ग्रामीण जनतेची नाळ ओळखणार्‍या खासदार होत्या. तुम्ही किती उच्चविद्याविभूषित आहात हे अनेकदा महत्त्वाचे नसते, तर तुम्ही सामान्य माणसांत किती जनमानसात मिसळता, त्यांची कामे किती करता हे पाहिले जाते. त्यामुळे केशरकाकू या बीड जिल्ह्यातील राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र किंवा कुठलेही क्षेत्र असे राहिले नाही, ज्या ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटविलेला नाही.

Kesharbai Kshirsagar News
NCP Crisis News : शरद पवार गटाची खेळी; 'राष्ट्रवादी कुणाची' सुनावणीत निवडणूक आयोगालाच पकडणार कोंडीत?

जिल्ह्यातील नगर-परळी-बीड या रेल्वेमार्गासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांना या भागातील लोकांची निकड लक्षात आणून दिली. भलेही नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाला म्हणावी तशी गती मिळाली नाही. परंतु रेल्वेसाठीचा संघर्ष सामान्य लोकांना हाताशी धरून केशरकाकू यांनी जो उभा केला तो महत्त्वाचा असल्याचेही पत्रकार पिंगळे म्हणतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com