

अब्बास सय्यद
Dharashiv News : ज्वारीचे कोठार अशी ओळख असलेल्या भूम (जि. धाराशिव) तालुक्यातील शेतकरी खरीप व रब्बी हंगामालीत आपला शेतमाल बार्शी (जि. सोलापूर), जामखेड (जि. अहमदनगर) अशा मोठ्या बाजार समित्यांमध्ये नेऊन विकतात. कारण भूम येथील दोन खोल्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समितीवर राज्याचे आरोग्यमंत्री, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची सत्ता आहे. असे असूनही गाळे बांधकाम व शेतकरी निवासाच्या बांधकामाला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी अन्य ठिकाणी जावे लागत आहे.
भूमची बाजार समिती अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताब्यात होती. त्या काळातही बाजार समितीतील कामे झाली नाहीत. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) व भाजपने (BJP) युती करून बाजार समितीची सत्ता मिळवली. युतीने निवडणुकीत दिलेला वचननामा आश्वासक होता. मात्र, कामांना अद्याप मुहर्त सापडलेला नाही. बाजार समितीकडून मूलभूत सुविधांसह भाडेतत्त्वावर गाळे मिळावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तालुक्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. मात्र, परतीच्या पावसावर यंदाचा रब्बी हंगाम चांगला होईल, अशी आशा आहे.
भूम तालुका हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. सोलापूर, बार्शी, पुणे, सातारा, सांगली या भागात भूम तालुक्यातील रब्बी ज्वारीला मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत येथे आडत व्यापाऱ्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे. यासाठी या पूर्वी नोंदणीकृत व्यापाऱ्यांची बैठक झाली. मात्र, हाती काहीही लागले नाही. आडत व्यापाऱ्यांची संख्या वाढली तरच लिलाव पद्धत सुरू होईल. त्यातून बाजार समितीचे उत्पन्न वाढून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या बाबत पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त होत आहे.
ही बाजार समिती युवकांच्या हाती आहे. त्यामुळे बदल होतील, शेतकऱ्यांच्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. ही युवकांची फळी फक्त कात्रज ते भूम दौऱ्यात मग्न असते, असे सांगितले जाते. त्यांचे काम मात्र आतापर्यंत तरी शून्यच आहे. कृषी उत्पन्न बाजर समितीतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. आडत व्यापारी यांना बसण्यासाठी सुस्थितीतील कट्टे नाहीत. यासह अन्य गैरसोयीही आहेत. सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती दोन खोल्यांचीच आहे. तेथे स्वच्छतागृह नाही. भूम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी संचालक मंडळाने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सध्या शेतकरी उडीद, मका, सोयाबीन, राजमा, गहू बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. निसर्गाने कहर केला आहे. पाऊस कमी आहे. त्यामुळे उत्पन्न कमी मिळणार आहे. एकीकडे अशी परिस्थिती अशताना शेतमालाला व्यापारी कवडीमोल भाव देत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशस्त बांधकाम करावे, अशी मागणी काँग्रेसचे (Congress) भूम विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मोईज सय्यद (शेकापूर) यांनी केली आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.