

Latur News : लातूर जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत प्रक्रिया मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान चेअरमन धीरज देशमुख यांच्याविरोधातील सर्व उमेदवाराचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे एकमेव अर्ज राहिल्याने धीरज देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला जात होता. मात्र, भारत चामले यांचा अर्ज न्यायालयाच्या निर्णयानंतर वैध ठरल्यामुळे आता धीरज देशमुख यांना ते थेट टक्कर देणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धीरज देशमुख विरुद्ध भारत चामले या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजपच्या पॅनेलमध्ये लढत होत आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जणांनी माघार घेतली होती. त्यानंतर कोणत्या मतदारसंघातून कशा लढती होतील याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध मतदारसंघांतील संभाव्य लढतींचे चित्र समोर आले आहे.
तालुकास्तरीय विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या मतदारसंघांपासून ते प्रक्रिया, गृहनिर्माण, सहकारी पतसंस्था, मजूर संस्था, ओबीसी आणि इतर संस्था मतदारसंघांपर्यंत अनेक ठिकाणी थेट लढती रंगण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत केवळ उमेदवारांचे भवितव्यच नव्हे, तर लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावरील वर्चस्वाचीही परीक्षा होणार आहे. सात तालुक्यांतील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदारसंघांसह सहा संस्थात्मक मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांची नावे पुढे आली आहेत. काही ठिकाणी राजकीय आणि सहकार क्षेत्रातील परिचित चेहरे आमनेसामने येत असल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.
लातूर तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात हेमंत पाटील आणि शरद शिंदे यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघाकडे विशेष लक्ष असेल. कारण जिल्हा बँकेच्या सत्ताकारणात लातूर तालुक्याचे महत्त्व मोठे आहे. तर दुसरीकडे निलंगा तालुक्यात संगीता अशोक पाटील आणि अरविंद पाटील निलंगेकर यांच्यात लढत आहे. ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नसून निलंगा परिसरातील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.
संगीता पाटील या माजी जिल्हा बँक अध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी आहेत, तर अरविंद पाटील हे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू आहेत. त्यामुळे या लढतीला कौटुंबिक आणि राजकीय संघर्षाची देखील किनार आहे.
शिरूर अनंतपाळ, देवणी - उदगीरमध्ये चुरस
शिरूर अनंतपाळमध्ये प्रकाश पाटील वाकळीकर विरुद्ध अतुल गंभीरे, देवणीत दिलीप पाटील नगराळकर विरुद्ध भगवान पाटील तळेगावकर, तर उदगीरमध्ये प्रीती भोसले विरुद्ध बसवराज बिरादार अशी लढत होत आहे. या मतदारसंघांमध्ये स्थानिक सहकारी संस्थांचे प्रतिनिधी निर्णायक भूमिका बजावू शकतात. विशेषतः उदगीरमध्ये प्रीती भोसले यांचे नाव चर्चेत आहे. त्या दिवंगत माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या लढतीला राजकीय वारशाचीही पार्श्वभूमी आहे.
जळकोटमध्ये आशिष पाटील विरुद्ध धर्मपाल देशोटे, तर चाकूरमध्ये संतोष पाटील विरुद्ध गोविंद माकणे अशी लढत आहे. या दोन्ही मतदारसंघांतील निकालावर स्थानिक सहकार क्षेत्रातील गटबाजी आणि मतदारांशी असलेला संपर्क प्रभाव टाकू शकतो. तालुक्यांबरोबरच विविध सहकारी संस्थांच्या मतदारसंघांतही चुरस आहे. यात प्रामुख्याने प्रक्रिया मतदारसंघात माजी आमदार धीरज देशमुख विरुद्ध भारत चामले ही लढत रंगतदार होणार आहे.
गृहनिर्माण मतदारसंघामध्ये जयेश माने विरुद्ध दगडू साळुंके, सहकारी पतसंस्था मतदारसंघ -अशोक गोविंदपूरकर विरुद्ध ऋषिकेश कराड, मजूर संस्था मतदारसंघात जगन्नाथ पाटील विरुद्ध गिरीश पाटील, ओबीसी मतदारसंघ - चंद्रशेखर दोंदमे विरुद्ध बाबू खंडाडे, व्हीजेएनटी मतदारसंघ शेषराव हाके विरुद्ध महादेव साळुंके. यापैकी प्रक्रिया मतदारसंघ विशेष महत्त्वाचा आहे. विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांचे नाव या मतदारसंघाशी जोडले गेले असून, त्यांची राजकीय आणि सहकार क्षेत्रातील पकड लक्षवेधी आहे.
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांची लढत विशेष चर्चेत आहे. प्रक्रिया मतदारसंघातून त्यांच्याविरोधात भारत चामले मैदानात आहेत. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक केवळ संचालकपदाची नसून बँकेवरील नेतृत्व कायम ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. दुसरीकडे विरोधकांना त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची संधी आहे. तिकडे सहकारी पतसंस्था मतदारसंघात अशोक गोविंदपूरकर आणि ऋषिकेश कराड यांच्यात लढत आहे. या निवडणुकीत आमदार रमेश कराड यांनी स्वतःचे उमेदवारी अर्ज मागे घेतले; मात्र त्यांचे पुत्र ऋषिकेश कराड निवडणूक रिंगणात कायम आहेत.
चार जागा बिनविरोध
4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये रेणापूरमधून सर्जेराव मोरे, अहमदपूरमधून अविनाश बाळासाहेब जाधव, अनुसूचित जाती मतदारसंघातून विवेक सिरसाट आणि औसा मतदारसंघातून शोभा अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे. महिला मतदारसंघातील दोन जागांसाठी मात्र तीन उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी पॅनेलकडून शीतल कल्याण पाटील आणि गीतांजली मधुकर लांडगे, तर विरोधी पॅनेलकडून सुरेखा मुरुडकर निवडणूक लढवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.