Latur DCC Bank : लातूर जिल्हा बँकेत निलंगेकरांना हवे परिवर्तन, तर देशमुखांना राखायची सहकारावर पकड!

Latur DCC Bank News : लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्ता कोणाकडे आहे? याचा मोठा प्रभाव राहिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसने जिल्हा बँकेची सत्ता आपल्याकडे राखली आहे.
Sambhaji Patil nilgekar, dhiraj deshmukh
Sambhaji Patil nilgekar, dhiraj deshmukh Sarkarnama
Published on: 
Updated on: 

latur News : लातूर जिल्हा बँकेत परिवर्तन घडवण्यासाठी भाजपकडून निलंगेकर बंधूंनी दंड थोपटले आहे. तर सहकार क्षेत्रावर असलेली आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी देशमुख काका-पुतणे मैदानात उतरले आहेत. निलंगेकर विरुद्ध देशमुख असे स्वरूप या जिल्हा बँकेच्या निवडणुकीला आले आहे. बिनविरोधसाठी झालेले प्रयत्न, त्यातून अपहरणाचा आरोप, न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आक्रमक झालेले विरोधक या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्ता कोणाकडे आहे? याचा मोठा प्रभाव राहिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसने (Congress) जिल्हा बँकेची सत्ता आपल्याकडे राखली आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी पुतणे अमित देशमुख, धीरज देशमुख यांना मार्गदर्शन करत विरोधकांना कायम सहकारात राजकारण आणण्यापासून रोखल्याचे बोलले जाते. विरोधकांनी मात्र कायम काँग्रेस आणि देशमुख कुटुंबाने बँकेची सत्ता स्वतःच्या स्वार्थासाठी राबवल्याचा आरोप केला.

महायुतीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले होते. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या निर्णयाने महायुतीत मिठाचा खडा पडला, असा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. आता प्रत्यक्ष मैदानात अरविंद पाटील निलंगेकर यांना उतरवून संभाजी पाटील त्यांना पडद्यामागून रसद पुरवणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने धीरज देशमुख आणि अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

सत्ताधारी देशमुख गटाच्या १९ पैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता उर्वरित पंधरा जागासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी दाखल करणे, अर्ज मागे घेणे या सर्व प्रक्रियेत एकूण सहा जागेवर एक एकच उमेदवार राहिले होते. यात विद्यमान अध्यक्ष धीरज देशमुख यांचाही समावेश होता. यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही जणाचे अर्ज छाननीत बाद केले होते. विभागीय सहनिबंधकांनी काही जणांचे अपिल फेटाळले होते. यातून उच्च न्यायालयात काही उमेदवारांनी धाव घेतली. त्यानंतर निकाल बाजूने लागल्यामुळे हे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले. यातून धीरज देशमुख यांच्यासह अनेकांचे बिनविरोधचे स्वप्न भंगले आहे.

ही निवडणूक बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या वतीने धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. सहकार पॅनलच्या माध्यमातून त्यांनी सत्ता राखण्यासाठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत पहिल्यापासून भाजपचे (BJP) प्रदेश सरचिटणीस अरविंद पाटील निलंगेकर विरोधकांच्या वतीने नेतृत्व करताना दिसत आहेत. उमेदवारांची न्यायालयीन लढाई लढण्यापर्यंत त्यांचाच पुढाकार राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे. त्यांच्यासोबत ऋषिकेश कराड हे तरुण नेतृत्वही आहे.

विरोधकांच्या पॅनलला छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनल असे नावही देण्यात आले आहे. त्यांच्यासोबत माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड यांचे मार्गदर्शन असणार आहे. महायुती म्हणून निवडणूक लढावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी येथे मात्र महायुतीत अंतर्गत बंडाळी झालेली पहावयास मिळत आहे. यातून निलंगेकर कसा मार्ग काढतात? याकडे लक्ष असणार आहे.

'दृश्यम' अन् 'रामायण'ची चर्चा..

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एका रहस्यमयी हिंदी चित्रपटाची चर्चा सुरूवातीपासून होत आहे. भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांनी पहिल्यापासून ‘दृश्यम’ चित्रपटाचा संदर्भ देत सत्ताधारी देशमुख गटावर तोफ डागली आहे. समोर दाखवायचे एक अन् कारभार भलताच असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना काही प्रश्नही केले आहेत. आपल्याच कुटुंबातील सदस्यांना कर्ज कसे दिले जाते? पात्रता नसणारे कार्यकारी संचालक कसे राहतात? असे अनेक प्रश्न त्यांनी 'दृश्यम'च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना केले.

त्याला पहिल्यांदाच धीरज देशमुख यांनी उत्तर दिले. योगायोगाने बहुचर्चित रामायण चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याचा संदर्भ देत बँकेने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा पाढा त्यांनी वाचला. आमचा कारभार 'रामायणा'सारखा पारदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यापासून ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी देखील बँकेच्या कारभाराचे कौतुक केल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. त्यामुळे मतदानापर्यंत दृश्यम आणि रामायण या चित्रपटांची चर्चा मात्र रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.