Latur Lok Sabha Election : देशमुखांच्या 'मास्टरस्ट्रोक'ने लातूरमध्ये 'चमत्कार' घडण्याची काँग्रेसला आशा

Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देणे हा लातूरच्या देशमुखांचा मास्टरस्ट्रोक समजला गेला. 2014 पासून भाजपच्या ताब्यात असलेल्या लातूर मतदारसंघात त्यामुळे चमत्कार घडण्याची आशा काँग्रेसला आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Dharashiv Lok Sabha Election : उस्मानाबाद (धाराशिव) आणि लातूर लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मराठवाड्यातील या दोन्ही मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी झाले. 2014 पासून लातूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यापूर्वीच्या दोन्ही निवडणुका भाजपने मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रसचे देशमुख घराणे सक्रिय झाले आणि डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे निवडणुकीचा नूरच पालटला. त्यामुळे लातूरमध्ये चमत्कार होईल का, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का किरकोळ घसरला आहे. 2019 मध्ये 62.45 टक्के मतदान झाले होते. 2024 मध्ये 61.42 टक्के मतदान झाले आहे. निवडणुकीच्या (Dharashiv Lok Sabha Election) काही महिने आधी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरात सुरू होत्या. अखेर त्या खोट्या ठरल्या. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी राज्यमंत्री, औशाचे माजी आमदार बसवराज पाटील मुरुमकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा बंद झाल्या. अमित देशमुख यांचे काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे अत्यंत हुशार असे राजकारणी समजले जातात. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी निर्णय बदलला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकीत लातूरचे देशमुख फारसे सक्रिय नसल्याचे दिसून आले होते. तसे पाहता लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे, मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत तो ढासळला. 2024 च्या निवडणुकीत अख्खे देशमुख कुटुंबीय सक्रिय झाले आहे. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी डॉ. शिवाजी काळगे (Shivaji Kalage) यांना मिळवून दिली आणि हाच त्यांचा मास्टरस्ट्रोक ठरला, अशी चर्चा सुरू झाली. डॉ. काळगे हे जंगम समाजाचे आहेत. लिंगायत समाजात जंगम समाजाला आदराचे स्थान असते. याचा लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीतही फायदा होईल, अशी गणिते त्यामागे होती.

मराठवाड्यात मराठा आरक्षणाचाही प्रभाव आहे. भाजपच्याच काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे भाजप राज्यघटना बदलणार, अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली. दलित आणि मुस्लिम समाजात ती सर्वाधिक दिसून आली. त्याचा फटका भाजपला बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हे चित्र उस्मानाबाद आणि लातूर लोकसभा मतदारसंघा (Loksabha Election) पुरते मर्यादित नाही, राज्यासह देशभरात असेच चित्र निर्माण झाले आहे. नेमके काय होणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी राज्यमंत्री बसवराज पाटील (Basavraj Patil) यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात लिंगायत समाजातील नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बसवराज पाटील यांच्यापाठोपाठ माजी केंद्रीय गृहमंत्री, काँग्रेसचे मोठे नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivajirao Patil Chakurkar) यांच्या स्नुषा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. शिवाजी काळगे यांच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचा लातूरच्या देशमुखांचा प्रयत्न आहे. डॉ. काळगे हे धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याचे जावई आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील लिंगायत समाजातही काँग्रेसने संदेश दिला आहे. देशमुखांचा हा मास्टरस्ट्रोक लातूरमध्ये चमत्कार घडवणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. डॉ. काळगे विजयी झाले तर उमरगा - लोहारा विधानसभा मतदारसंघातही Vidhansabha Constituency महाविकास आघाडीला मोठे बळ मिळणार आहे, याकडे अद्याप कुणाचे फारसे लक्ष गेलेले नाही.

Lok Sabha Election 2024
Ajit Pawar News : आईसोबत गेलो तर तुमच्या पोटात का दुखलं, अजितदादांचा सवाल !

उस्मानाबाद मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अर्चनाताई पाटील यांची लढत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्यात झाली. अर्चनाताई या भाजपचे तुळजापूरचे आमदार राणजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत. दीर-भावजयीच्या या लढतीत चुरस निर्माण झाली आहे. गेल्या निवडणुकीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 63.75 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत ते 61.92 टक्के झाले आहे. पोस्टल मतांच्या आकडेवारीचा यात समावेश नाही. त्यामुळे टक्केवारी आणखी वाढू शकते. असे असले तरी 2024 मध्ये नव्या मतदारांची भर पडली आहे. त्यानुसार मतदानही वाढलेले आहे किंवा नाही हे अंतिम टक्केवारी जाहीर झालल्यानंतरच लक्षात येणार आहे.

धाराशिवच्या पाटील आणि निंबाळकर कुटुंबात टोकाचे राजकीय वैर आहे. धाराशिव मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे या दोन घराण्यांतील राजकीय युद्ध या निवडणुकीत पाहायला मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र आमदार राणाजगजितसिह पाटील (Ranajagjitsigh Patil) यांच्या पत्नी अर्चनाताई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत तुंबळ राजकीय युद्ध झाले. या राजकीय युद्धात बाजी कोण मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2024
Osmanabad-Aurangabad Renaming : उस्मानाबाद, औरंगाबादच्या नामांतरावर हायकोर्टाचे शिक्कामोर्तब; आता पुढे काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com