

Marathwada BJP : लातूर महापालिकेतील काँग्रेसचे माजी महापौर तथा आमदार अमित देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या विक्रांत गोजमगुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अमित देशमुख आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का होता. आता असाच धक्का भाजपला देखील बसला आहे. माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातच विक्रांत गोजमगुंडे यांच्यासह बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेत पक्षप्रवेश केला. महापालिका निवडणुकीआधीच लातूरमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये या आऊटगोईंगमुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पक्षाला हात दाखवत काही दिवसापूर्वीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता बिराजदार यांनीही पक्षप्रवेश केला.
2017 मध्ये महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती. पण अडीच वर्षानंतर पक्षाला ती सत्ता टिकवता आली नाही. काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवक आपल्याकडे घेत महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणली. त्यात भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत बिराजदार यांचा समावेश होता. काँग्रेस नगरसेवकांच्या पाठिंब्यावर विक्रांत गोजमगुंडे हे महापौर तर चंद्रकांत बिराजदार हे उपमहापौर झाले होते. अडीच वर्ष या दोघांनी महापालिकेत सत्ता उपभोगली होती.
महापालिकेतील सत्ता बिराजदार यांच्यामुळे गेल्याने भाजपमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी होती. आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीवरही प्रश्नचिन्ह होते. त्यात गोजमगुंडे व बिराजदार यांची मैत्री सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी शहरात संधी आहे, हे लक्षात घेऊन बिराजदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
भारतीय जनता पक्ष चंद्रकांत बिराजदार यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे बिराजदार हे कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यात त्यांची गोजमगुंडे यांच्यासोबतची मैत्री कामी आली. मंगळवारी (ता. नऊ) गोजमगुंडे हे नागपूरमध्ये होते. त्यांच्यासोबत बिराजदार यांची रात्री प्रवेशाबाबत चर्चा झाली. रात्रीतून बिराजदार हे नागपूरला गेले. सकाळी नऊ वाजता उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यानिमित्ताने लातूरचे माजी महापौर आणि माजी उपमहापौर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.