Amit Deshmukh News : लातूर-जहिराबाद महामार्गावर पडलेल्या भेगांवरून जिल्ह्यातील राजकारण तापले होते. काँग्रेसने निलंगा तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर परिक्रमा काढत निकृष्ट कामाचा आरोप करत आंदोलन केले होते. माजी मंत्री, निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या समर्थकांमध्ये या मुद्यावरून कलगीतुरा रंगला होता.
दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाल्याने या महामार्गाची लातूर जिल्ह्यात बरीच चर्चा झाली. आता या महामार्गाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत निकृष्ट कामाची पोलखोलच अमित देशमुख यांनी विधानसभेत आज (बुधवारी) केली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याला जोडणाऱ्या लातूर-जहिराबाद महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे. त्याची चौकशी करावी, या महामार्गावर पडलेल्या भेगा त्वरीत दुरुस्त कराव्यात, महामार्ग बांधतांना पाण्याचा निचरा होणाऱ्या व्यवस्था उभाराव्यात त्याच बरोबर महामार्गावर उभारण्यात आलेली प्रकाश व्यवस्था नियमीत सुरु राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा,अशी मागणी प्रश्नोत्तराच्या चर्चेत अमित देशमुख यांनी केली.
लातूर शहराच्या बाजुने महामार्ग गेला असल्याने या ठिकाणी पाण्याच्या निचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्याच बरोबर राष्ट्रीय महामार्ग बांधतांना तो शहर किंवा गावामधून जातो तेव्हा तेथे प्रकाश व्यवस्था उभारली जाते. मात्र ही प्रकाश व्यवस्था नियमीत सुरु राहत नाही. त्यामुळे अपघात व इतर समस्या निर्माण होतात.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाबद्दल कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र राज्यात राष्ट्रीय महामार्ग बांधतांना त्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लातूर-जहिराबाद महामार्गाचे काम निकृष्ट झाले आहे हे स्पष्टपणे जाणवत आहे. रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्याने दररोज अपघात घडत आहेत. त्यासंदर्भात चौकशी होणे आवश्यक असल्याचे अमित देशमुख म्हणाले.
काँग्रेसने सध्या राज्यातील महामार्गांच्या निकृष्ट कामावरून सरकारला लक्ष्य केले आहे. अटल सेतू मार्गावर पडलेल्या भेगा दाखवत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यानंतर लातूर मध्ये लातूर-जाहीराबाद महामार्गावर पडलेल्या भेगा वर काँग्रेसने निकृष्ट कामाच्या चौकशीची मागणी केली आहे.
लातूर-जहिराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामांचा विषय गांर्भीयाने घेऊन त्या बाबत कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गावर प्रकाश व्यवस्था व पाण्याचा निचरा व्यवस्थितरीत्या होण्याच्या दृष्टीने संबंधीत यंत्रणेसोबत संपर्क करुन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल,अशी ग्वाही सार्वजनीक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शासनाच्या वतीने दिली.
(Edited Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.