जलील पठाण -
Marathwada News : काँग्रेसमधून मोठे नेते भाजपमध्ये दाखल झाल्यापासून पक्षातील निष्ठावंतांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची चर्चा आहे. राज्यसभेवर नुकतेच निवड झालेले खासदार डॅा. अजित गोपछडे यांनी अशोक चव्हाण यांना उद्देशून केलेले विधान त्याच अनुषंगाने होते. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील हेदेखील भाजपध्ये दाखल झाले. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते. भाजपने त्यांना पुन्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द देत पक्षात घेतल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत. (Latest Marathi News)
यामुळे साहजिकच विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्यात अस्वस्थतेचे वातावरण आहे. बसवराज पाटील यांच्या गावात मुरुम येथे तातडीने स्वागताच्या निमित्ताने जाऊन पक्षाने त्यांना कोणताही शब्द दिलेला नाही, हे अभिमन्यू पवार यांना सांगावे लागेल. यानंतर हा प्रकार थांबेल, असे वाटत असतानाच नागरी सत्काराच्या निमित्ताने अभिमन्यू पवार यांनी तोच सूर आळवल्याचे दिसून आले. मी पहिला श्वास इथे घेतला आणि शेवटचाही इथेच घेणार, असे सांगत अभिमन्यू पवार यांनी बदलाच्या चर्चांना वेगळ्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिमन्यू पवारांना प्रमोशन देऊन पक्षश्रेष्ठी दिल्लीला पाठविणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहेत. दुसरीकडे नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले बसवराज पाटील मुरुमकर यांना औसा विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. या पाटील अन् पवार समर्थकांमध्ये सुरू असलेल्या सुप्त चर्चेला अभिमन्यू पवार यांनी औसावासीयांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार समारंभातच उघड केले. या चर्चांना काहीही अर्थ नसल्याचे सांगत त्यांनी मी पहिला श्वास औशाच्या मातीत घेतला आणि शेवटचा श्वासही याच मातीत घेणार, असे काहीसे भावनिक विधान केले.
याचाच अर्थ औशातून मीच उमेदवार असेल हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. अभिमन्यू पवार यांच्याकडून वारंवार असा प्रयत्न करणे म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी भीती, अस्वस्थता आहे हे दाखवते. याउलट बसवराज पाटील यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून असा कुठलाही दावा केलेला नाही. धाराशिव लोकसभा असो, की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत औशातून उमेदवारीचा विषय, बसवराज पाटील यांनी अत्यंत संयमित भूमिका घेतली आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात गेली अनेक वर्षे काम केल्याचा अनुभव म्हणा, की काँग्रेस संस्कृतीचा पगडा अद्यापही त्यांच्यावर कायम असल्याचे त्यांच्या वागण्यातून दिसून येते.
दुसरीकडे अभिमन्यू पवार मात्र नको त्या विषयाला चव्हाट्यावर आणून आपल्या मनातील भीती जाहीर बोलून दाखवत असल्याचे दिसते. औसा मतदारसंघातील विकासकामांसाठी दोनशे कोटींपेक्षा जास्त निधी आणल्याबद्दल अभिमन्यू पवार यांचा नागरी सत्कार झाला. बसवराज पाटलांचा भाजप (BJP) प्रवेश हा औसा विधानसभेचा शब्द घेऊनच झाल्याची चर्चा आणि तशा प्रकारच्या हालचाली पाहता अभिमन्यू पवार यांनी सत्कार समारंभात आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मी कुठेच जाणार नाही, असे सांगत पवार यांनी गुगली टाकली. महायुतीचा धाराशिव लोकसभेचा उमेदवार अजून निश्चित न झाल्यामुळे काहीतरी गडबड असल्याची जाणीव दोघांच्या समर्थकांना सतावत आहे.
दोनशे कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर करून औशाच्या विकासात ऐतिहासिक भर घालण्यात माझ्यापेक्षा माझे नेते देवेंद्र फडणवीस यांचा मोठा सहभाग असल्याने हा सत्कार मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना समर्पित करतो. माझा नेता मोठा झाला तर मी आपोआपच मोठा होणार असल्याने माझ्या नेत्याला मोठं करण्यास हातभार लावा. मी औशाला काहीच कमी पडू देणार नाही. देवेंद्रजींच्या पाया पडून त्यांच्या जवळ असलेली चावी घेतो आणि मला जे लागते ते घेऊन चावी परत त्यांच्याकडे ठेवतो, असे सांगत पवार यांनी फडणवीस आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सुचवले. एकूणच बसवराज पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर विद्यमान आमदार अभिमन्यू पवार अधिक सावधानतेने वाटचाल करताना दिसत आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.