Marathwada News : लोकसभा निवडणुकीचे वेध लागले असल्यामुळे सर्वच पक्षात लगीनघाई सुरू आहे. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा प्रश्न गंभीर बनला आहे. जास्तीत जास्त जागा स्वत:च्या पारड्यात पाडून घेण्यासाठी अंतर्गत चढाओढ लागली आहे.
वर्षानुवर्षे वैचारिक व राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांसोबत सामोपचाराने जुळवून घेण्याची वेळ आल्याने महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत समन्वय ठेवण्याचे मोठे आव्हान राज्य नेतृत्वासमोर असणार आहे. परभणी येथे महायुतीच्या झालेल्या पत्रकारपरिषदेत अंतर्गत चढाओढ जाहीरपणे दिसून आली.
पत्रकारपरिषदेस उपस्थित असलेले भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने, जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे यांची उपस्थिती होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी बोलताना तीनही पक्षांच्या नेत्यांनी उमेदवार आपल्याच पक्षाचा असेल व चिन्हही आमचेच असेल, असा दावा केला. यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये अंतर्गत बेबनाव दिसून आला. भाजपचे नेते एकीकडे सांगत आहेत की, महायुतीच्या जागावाटपात परभणी लोकसभा मतदारसंघ भाजपलाच मिळेल किंवा मित्रपक्षाला मिळाला तर निवडणूक चिन्ह कमळ हेच असेल. याचाच पुनरुच्चार लोकसभा निवडणूकप्रमुख माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दुर्राणी यांनी त्यांच्या दाव्याला खोडत परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, असा विश्वास व्यक्त करून चिन्ह घड्याळ हेच असेल,असेही ठामपणे सांगितले.
या स्पर्धेत शिवसेनाही मागे राहिली नाही. जिल्हाध्यक्ष व्यंकट शिंदे यांनीही धनुष्यबाण आमच्या पक्षाकडे असल्याने परभणीची जागा आम्हालाच मिळेल, असा दावा केला. मित्रपक्षांच्या उपस्थितीतच परस्परविरोधी दावे केल्याने महायुतीमधील नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे जाहीरपणे दिसून आले.
दरम्यान, महायुतीच्या पत्रकारपरिषदेस शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या प्रहार पक्षाचे प्रतिनिधी निमंत्रण न मिळाल्याने अनुपस्थित होते.
यासंदर्भात पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून जाहीर नाराजी व्यक्त केली. प्रहार हा महायुतीमधील घटकपक्ष असूनही मागील दोन वर्षांत आम्हाला नेहमीच डावलण्यात आले. शासकीय समित्यांवर नियुक्त्या, निधीवाटप करताना महायुतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचा कधीच विचार केला गेला नाही. त्यामुळे 14 तारखेला होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यास प्रहार जनशक्ती पक्ष सहभागी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्ष निवडणुकांना अवधी असताना महायुतीला पत्रकार परिषदेपासूनच अपशकुन झाल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
(Edited By- Ganesh Thombare)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.