
Hingoli News : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळेच सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असतानाच हिंगोली लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झाली. त्यानंतर शहरात फटाके फोडण्यात आले. त्यासोबतच आता हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध दावे केले जात आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून तब्बल पावणेतीन लाख मते घेऊन शिवसेनेचे हेमंत पाटील निवडून आले होते. हिंगोलीत जर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली तर चार लाखांपेक्षा अधिक मताधिक्यांनी हेमंत पाटील निवडून येतील, असा दावा हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. (Lok Sabha Election 2024 News)
हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचार सभा व्हावी, अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याचे संतोष बांगर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. हिंगोली लोकसभेसाठी हेमंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना येत्या दोन किंवा तीन तारखेला मोठे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून माजी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांची उमेदवारी दिली, त्यानंतर आमचा विजय ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. हा उमेदवार गेल्या विधानसभा निवडणुकीत चार नंबरवर गेला होता. त्यामुळे या मतदारसंघात नागेश पाटील-आष्टीकर यांचा निभाव लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी कामाच्या जोरावर हिंगोली लोकसभेमध्ये अनेक उपक्रम आणले आहेत. हळद संशोधन केंद्र, हिंगोली मुंबई ट्रेन यासह अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम हेमंत पाटील यांनी केले आहे. संशोधन केंद्रामध्ये जिल्ह्यातील चार ते पाच हजार जण कामाला लागतील, असा हक्काचा खासदार या आधी झाला नाही, यापुढेही होणार नाही, असा तडफदार खासदार आम्हाला लाभला असल्याचे संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी स्पष्ट केले.
R