Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महायुतीच्या तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार? याचे पत्ते अद्याप कोणीच उघड करताना दिसत नाही. मात्र तरीही धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हेच असणार, याची घोषणा काँग्रेसचे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी औसा येथे केली.
महायुतीला अजून धाराशिवमध्ये आमच्याविरोधात लढण्यासाठी उमेदवार सापडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. अमित देशमुख यांनी जाहीरपणे ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेतल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ओमराजे विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चांना ब्रेक लागला आहे.
औसा येथील एका खासगी कार्यक्रमासाठी अमित देशमुख (Amit Deshmukh) आले होते. यावेळी त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत, हे जाहीर करून टाकले. विशेष म्हणजे ओमराजे यावेळी व्यासपीठावरच उपस्थित होते. (Dharashiv Loksabha Constituency)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमित देशमुखांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाल्याची चर्चाही होत आहे. लोकसभेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर आली आहे. असे असताना महायुतीकडून धाराशिव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत ठोस अशी चर्चा होताना दिसत नाही. मतदारसंघात अनेक इच्छुकांची बॅनरबाजी सुरू असली तरी महायुतीच्या शिक्कामोर्तबानंतरच बॅनरवरचे इच्छुक प्रत्यक्ष मैदानात उतरणार? की मग बॅनरवरच राहणार, हे स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे शिवसेनेतील बंडानंतरही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्या उमेदवारीवर अमित देशमुख यांच्या वक्तव्याने जणू शिक्कामोर्तबच झाले आहे. मध्यंतरी ओमराजे हे लोकसभाऐवजी विधानसभा लढवण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू होत्या. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) यांनी मतदारसंघावर मजबूत पकड बसवलेली असताना त्यांनी विधानसभेसाठी प्रय़त्न करणे लोकांना पटत नव्हते.
औशाचे माजी आमदार बसवराज पाटील महाविकास आघाडीकडून धाराशिव लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र मागील काही दिवसांमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोललं जात होतं. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांना पर्याय कोण याचा शोध सुरू होता. मात्र या सर्वच चर्चांवर अमित देशमुखांनी ब्रेक लावला असून त्यांनी निंबाळकर यांना तुम्हीच महाविकास आघाडीचे उमेदवार आहात, हे जाहीरपणे सांगून टाकले. शिवाय तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू, असा शब्द देत निवडणुकीसाठी शुभेच्छाही दिल्या.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.