

Maharashtra municipal elections : महापालिका निवडणुकांचा निकाल लागला आहे. काही जिल्ह्यात झेडपीची तयारी सुरू आहे. परंतु ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी, लातूर इथं पत्रकार परिषद घेत ओबीसींच्या आरक्षित जागांवर घुसखोरी झाल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
प्रकाश शेंडगे यांची ही ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी असली, तरी या मुळे आगामी काळात पुन्हा, मराठा-ओबीसी असा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिकांसाठी (Municipal Elections) काही मराठा उमेदवारांनी 'ओबीसी'साठी आरक्षित असलेल्या जागांवर बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर निवडणूक लढवली आहे. त्यापैकी अनेकजण निवडूनही आले आहेत. अशांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर उघडे पाडणार आहोत. एखादवेळी जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र वैध ठरवले तरी त्याला न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
राज्य सरकारने विविध आदेशाच्या माध्यमातून ओबीसी (OBC) आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला. ओबीसी समाजाला राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही आघाडी स्थापन केली आहे. एकंदर राजकीय परिस्थितीवरून ओबीसी आरक्षणाचे वस्त्रहरण होत आहे. मतांपुरता वापर झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सत्ता मिळवणे, हा एकमेव मार्ग आहे, असेही ते म्हणाले.
प्रकाश शेंडगे म्हणाले, "महापालिका निवडणुकीत सर्वत्र पैशांचा महापूर पाहायला मिळाला, ही बाब दुर्दैवी आहे. निवडणुकीत ओबीसी कार्यकर्त्यांना एबी फॉर्मही मिळू दिले नाहीत. ओबीसीचे कार्यकर्ते पैशाने गरीब असले, तरी त्यांच्यामागे आता ओबीसी बहुजन आघाडीची ताकद असणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना आता आपला पक्ष घरपोच एबी फॉर्म उपलब्ध करून देणार आहे."
आपली आघाडी जिल्हा परिषद - पंचायत समितीची निवडणूक लढवणार असल्याचेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. ज्या ठिकाणी आपला पक्ष नसेल, तिथं मूळ ओबीसी उमेदवारांच्या पाठीशी राहणार आहोत. सध्या निवडणूक आयोग उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळू देत नाही. हा प्रकार कोणाच्या तरी दबावापोटी केला जात आहे, असा गंभीर आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला.
तसंच सगळा ओबीसी समाज एकवटला तर त्याची टक्केवारी 80 टक्क्यांच्या घरात जाऊ शकते, असेही प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. ओबीसी बहुजन आघाडीचे महासचिव चंद्रकांत बावकर, खजिनदार जे. डी. तांडेल, राज्य संघटन सचिव पांडुरंग मिरगळ, लातूर जिल्हा प्रभारी लक्ष्मण दावणकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.