

Parbhani News : जिल्ह्यातील सुपीक शेतीवरून प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग नेण्याच्या निर्णयास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत इंचभरही जमीन देणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला होता. अखेर, या लढ्याला यश मिळाले असून राज्य शासनाने जिल्ह्यातील महामार्गाची आखणी बदलण्यास मान्यता दिली आहे. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग वर्धा ते कोल्हापूर असा असून, तो राज्यातील 13 जिल्ह्यांतून जाणार आहे.
यात परभणी व सोनपेठ तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती संपादनाची प्रक्रिया सुरू होती. सोनपेठ तालुक्यातील 10 गावांतील 1 हजार 242 शेतकऱ्यांची सुमारे 204 हेक्टर जमीन, तर परभणी तालुक्यातील 15 गावांतील 1 हजार 882 शेतकऱ्यांची तब्बल 407 हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन होते.
मागील दीड ते दोन वर्षांपासून प्रशासनाकडून या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, आधीच समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा शेती गमावण्यास तीव्र विरोध दर्शवला. आमच्या उपजीविकेचे काय? असा सवाल करत त्यांनी आंदोलन छेडले.
दरम्यान, परभणी तालुक्यातील सहजपूर, जवळा, अमडापूर तसेच सोनपेठ तालुक्यातील कोठाळा येथे पोलिस बंदोबस्तात संयुक्त मोजणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यावेळी शेतकरी व प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला. काही ठिकाणी शेतकऱ्यांना जबरदस्तीने हटविण्याचे प्रकार घडले. महिलांशीही अयोग्य वर्तन झाल्याच्या आरोपांमुळे संताप आणखी वाढला.
यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले. प्रशासनाने शेतकऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर जिल्हा प्रशासनाने हा अहवाल शासनाकडे पाठवला आणि शासनाने जिल्ह्यातील महामार्गाची आखणी बदलण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, मराठवाड्यातील बीड व लातूर जिल्ह्यांतील मूळ आखणी कायम ठेवण्यात येणार असून, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये सुधारित मार्ग निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे आता नव्या मार्गाबाबत उत्सुकता निर्माण झाली असली, तरी इतर भागातील शेतकर्यांतही चिंतेचे वातावरण आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही शेतकर्यांच्या या लढ्यात सहभागी होत बळजबरीने शेतकर्यांची जमीन घेता येणार नाही, असा आक्रमक पावित्रा घेतला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असे स्पष्ट सुनावले होते.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होण्याआधी परभणीत आंदोलनाच भडका उडाला असल्याने परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमीन मोजणीस स्थगिती देण्याची मागणी केली होती. तेव्हा या मोजणीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता काही प्रमाणात शक्तीपीठ महामार्गाच्या आखणीतच बदल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.