

मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला मुंबईत आंदोलनासाठी येण्याचे आवाहन केले.
मराठा समाजाचा पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आरक्षणासाठी मोठे आंदोलन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Mumbai News : धनगर समाजाची ताकद मोठी आहे, पण ती तुम्हाला कधी कळालीच नाही. मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे निघा, घरी बसून आरक्षण मिळणार नाही. मुंबईत आले तर तुम्ही आरक्षण घेऊनच परत जाल. पण त्यासाठी आधी धनगर समाजाने कडवट झाले पाहिजे, तुम्ही ताकदीने रस्त्यावर उतरले तर सहा कोटी मराठा समाज तुमच्या मागे उभा करतो, असा शब्द मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे आणि धनगर समाजाला दिला.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, या मागणीसाठी आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले. आज आंदोलनाचा नववा दिवस आहे. हे आंदोलन पेट घेत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी आज दीपक बोऱ्हाडे यांची भेट घेऊन धनगर आरक्षणाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन जातीच्या लेकराचं कल्याण करा. मान-पान बाजूला ठेवा आणि समाजासाठी पुढे या. समाजानेही नेत्यांचा योग्य मान, सन्मान राखला पाहिजे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केली.
गोरगरिब धनगर बांधवांना आरक्षण मिळावे म्हणून दीपक बोऱ्हाडेंचे आमरण उपोषण सुरू आहे. आम्ही ताकदीने तुमच्यासोबत आहोत. समाजाच्या लोकांना कधी विनंती करायची नसते, आमच्या भावना समजून घ्यायच्या असतील तर समजून घ्या, आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. एकाही धनगराने घरी थाबंल नाही पाहिजे, त्याशिवाय न्याय मिळणं शक्य नाही. आपल्याकडे काही कमी नाही, येण्यासाठी. स्वतःच्या जातीचे लेकरंबाळं मोठं करायचे असतील तर झोकून देवून काम करावे लागते.
मी आल्यामुळे पुन्हा सुरू झालं, दोघाच्या पोरांनी ऊस तोडायला जायचं का? माझा समाज यातून बाहेर पडला, धनगरांनी यातून बाहेर पडा. काड्या लावणारे, खेळ पांगवणारे आम्ही दूर केले. चौंडीच्या आंदोलनापासून मी सांगीतलं की, आमचा तुमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे. तुम्ही मिळेल त्या साधनाने मुंबईला या आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. नेत्यांना एक करा, उपोषण सोडायची वेळ आली तरी चालेल नेतृत्व त्यांना करू द्या. मी नेता नाही, मराठा आंदोलक आहे. तुमच्याकडे चांगले नेते आहेत. जातीचं कल्याण करायचं असेल तर पडा त्यांच्या पाया, राजकारण आवश्य करा, पण जात म्हटलं की एक या, मी ते केलं आता ताकदीने समाज आमच्या मागे उभे आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
नेत्यांना पुढे करा, जातीचा प्रश्न मार्गी लावा...
धनगर समाजामध्ये अनेक मोठे नेते आहेत. शेंडगे, तायवडे, जानकर यांना बोला, आरक्षण पाहिजे असेल तर सगळ्या नेत्यांना भेटा, पाहिजे तर आंदोलन बंद करा. आळशीपण सोडा, धनगर कडवट झाला तर आरक्षण घेऊनच तुम्ही मुंबईबाहेर जाल. सहा कोटी मराठा तुमच्या मागे उभा करतो. महायुतीला निवडून आणा की महाविकास आघाडीला, पण आम्हाला आरक्षण द्या, ही भूमिका तुम्ही घेतली पाहिजे.
आम्ही दोन टप्प्यात वागणार नाही. धनगराची माऊली मेंढ्या मागे उन्हा-तान्हात पाय जाळती. तुम्हाला ताई-माऊलीची वेदना, कळकळ असेल तर धनगर घरी बसणार नाही, मुंबईत येईल. आधी जात मग नेता हे ठरवा. सगळ्या नेत्यांना पुढे करा, जातीचा प्रश्न मार्गी लावला तर आम्ही तुमचेच, तोपर्यंत नाही हे सांगा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
लोक मला म्हणतात, तुम्हीच यांना बसवले, माझ्यात तोंडाला फेस आला होता. मी यांना कशाला बसवू? शंकाकुशंका ठेवू नका, चुका झाल्या असतील तर समाजापुढे मान्य करा. बीडला मोर्चा होता त्या दिवशी संभाजीराजे तिथे आले. अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. सगळे म्हटले मी शेवटी बोलेल, पण मी सांगितलं राजे इथे असताना मी शेवटी बोलणार नाही. कोल्हापूरला मी शाहू राजेंना स्टेजवर बोलावलं, आपल्या नेत्यांना मान द्या, मी सगळ्या धनगर नेत्यांना बोलतो. आतापर्यंत कधी कोणाला फोन केला नाही, पण आता सगळ्यांना बोलणार. की आता तुम्ही एकत्र या. तुम्हाला वेदना कशा होत नाही? प्रतिष्ठा, मान सन्मान बाजूला ठेवा, मिळू द्या धनगरांना आरक्षण. आता पेटून उठा असेही जरांगे पाटील यांनी आवाहन केले.
फडणवीस डाव टाकतात...
शांतते लढा द्या, गोंधळ करू नका, शांततेमध्ये मोठी शक्ती असते. तुम्ही सगळे मनावर घ्या, माझ्यावर देवेंद्र फडणवीसांनी अनेक डाव टाकले. माझ्यावर दोन एसआयटी टाकल्या, पण आपण आरक्षणच घेतले. पण जीआर काढल्यानंतर मी त्यांना श्रेयही दिलं. पण अजून लागू नाही केलं, लगेच लागू करतील तर त्यांना फडणवीस कसे म्हणणार? असा चिमटा जरांगे यांनी यावेळी काढला. धनगरांना आरक्षण देऊन टाका, अन् मिटवा विषय. 2014 मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितले, धनगरांनी भाजपला मतदान केलं. मी जसे 29 पाडले, तसं करा, तुम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा सल्लाही जरांगे यांनी उपस्थितांना दिला.
गावांकडे काही पाऊस नाही, कामं नाही कोणाचे काही नुकसान झाले नाही. काम असल्याचं सांगून आपण स्वतःच समाधान करतोयं. आम्ही आंदोलन केलं तेव्हा गणपती, महालक्ष्मी, लक्ष्मीपूजन आम्ही इथंच केलं. तुम्ही कुठही राहून सगळं करू शकतो. तुम्ही एकदा सांगा आम्ही सगळे धनगर सांगा मुंबईत येतो, आम्ही तुमच्या आधी येतो. समाज चुका पदरात घेतो, वरिष्ठ, मोठे नेते यांचा योग्य सन्मान राखा. आपल्यात काही झालंच नाही, पण उगाच तुम्ही फुगून बसले आणि आम्हीही. आपल्यात वैरच नाही, तुम्ही रुसले म्हणून आम्ही रुसलो आणि मोठी दरी निर्माण करून बसलो, अशी कबुलीही जरांगे यांनी यावेळी दिली.
जे खोडीचे नेते आहेत, त्यांना मी सोडत नसतो. ज्याला आपलं आणि तुमचं जमूच द्यायचं नाही, त्याला कसं सोडू? मराठा, धनगर, दलित, मुस्लिम समाज एकत्र आले तर यांचा खेळ खल्लास. तुमचे दहा-पाच मंत्री, आमचे दहा-पाच मंत्री होतील. आपली लीड कोण तोडील? पुढच्या पक्षाला मतदानच राहणार नाही, आपलं सुख आपण दुसऱ्याला देतोय. आपण कुत्र्यासारखं त्यांच्यासमोर उभं राहतोय. तुम्ही एकत्र या ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. रान सुपीक करून ठेवायची जबाबदारी आपली. नेत्यांनीही मन मोठं करा, मोठ्या मनान या इथे बोला. सरकारची भूमिका सांगा, काय बरोबर, काय चुकतंय, इथे येऊन सांगा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
तुम्हाला मोठं मन करांव लागेल, समाज मोठं मन करणार नाही, आम्ही मोठा भाऊ म्हणून सांगतोय, एकदा आमचं ऐका. काळजी घ्या, उपोषणात पाणी प्या, मध्ये सोडलं तर खेळ बिघडतो. पहिल्या दिवशी पिले असेल तर पुढे प्यायचे, नाही तर प्यायचेच नाही. मी सतरा दिवस पाण्याशिवाय काढले. पण मध्येच पाणी पिलं तर सगळा खेळं बिघडतो. मी उपोषणात कधीच पाणी पिलं नाही इथं. पहिल्यांदा पाणी पिलं तर पोटात आग होते, जाळ होतो. उद्या, तुम्हाला फडणवीस याच्याशी लढायचं. तो साधा माणूस नाही, खुटाचं घालतो. पण मी त्याचा खुटाच उपटून काढला. आता आमचं त्यांच सध्या बरं आहे. मी जातीचाच राहिलो, नेत्याचा झालो नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
जातीसाठी नाक घासा, सगळ्यांनी जीव लावा, मी सगळ्या धनगर नेत्यांना फोन करणार. मला फोन आला आणि मी आलो. तुमच्यासाठी अपमान सहन करायला तयार आहे. आपण शब्द दिला की तो पूर्ण करतो. शांतते आंदोलन करा हिंसक वळण लागलं तर तमचं आंदोलन मोडलं समजा. तुमची ताकद ओळखा, मी सगळ्यांना सांगने कोणता नेता काय म्हणला? जो पॉझिटीव्ह आहे, ते ही सांगणार. कोणी नेता नाराज असेल तर ते ही सांगू, समाजाने सगळी तयारी ठेवा, असे आवाहनही शेवटी जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला केले.
1. मनोज जरांगे पाटील यांनी काय आवाहन केले?
धनगर समाजाला मुंबईत येऊन आंदोलन करण्याचे आवाहन केले.
2. कोणत्या मुद्द्यावर आंदोलन आहे?
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी.
3. मराठा समाजाची भूमिका काय आहे?
जरांगे पाटील यांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
4. दीपक बोऱ्हाडे कोण आहेत?
ते धनगर आरक्षणासाठी उपोषण करणारे कार्यकर्ते आहेत.
5. पुढे काय होऊ शकते?
मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि राजकीय तणाव वाढू शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.