Beed News : यंदा दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाचे दोन मेळावे होत आहे. त्याचसोबत बीडमधील सावरगाव येथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मेळावा असणार आहे. यावर्षी त्यात भर म्हणजे मराठा आरक्षणासाठी जीवाचं रान करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही दसऱ्याच्या दिवशीच समाजाचा मेळावा बोलावला आहे. पोलिसांची परवानगी मिळाल्यानंतर या मेळाव्याची आता मराठा समाजाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा दसरा मेळावा शनिवारी (ता.12) होणार आहे. हा दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी मराठा समाजाने कंबर कसली आहे. या मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा (Dasra Melava) नारायण गडावरील तब्बल 900 एकरवर घेतला जाणार आहे. त्यासाठी सुमारे 200 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. तसेच 10 वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहे.
याचवेळी 100 हून अधिक रुग्णवाहिका या मेळाव्यात तैनात राहणार आहे. या मेळाव्यासाठी आतापर्यंत नारायणगडावर जवळपास 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद असणार आहे. तसेच जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मराठा (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मेळाव्यासाठी आयोजकांकडून दिवस-रात्र मेहनत घेतली जात आहे. मेळाव्यानंतर महाप्रसाद असल्याने परिसरात पाण्याची व्यवस्था ही टँकर आणि बाटल्यांमधून करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या या मेळाव्याला पोलिसांची परवानगी मिळणार की नाही,याबाबत साशंकता असल्याने मराठा समाजामध्ये धाकधूक होती.अखेर जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला परवानगी मिळाली आहे.
पोलिसांनी मेळाव्याला परवानगी देत असताना एक दोन नव्हे तर 16 अटी घातल्या आहेत. मेळाव्यात प्रक्षोभक भाषण तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करणार नसल्याची देखील अट घालण्यात आली आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यात अडथळा निर्माण करत असल्याची टीका देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी अद्यापही पूर्ण होत नसल्याने उपोषणकर्ते मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाज व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मेळावा होत असल्याने त्याचं महत्त्वं वाढलं आहे.या मेळाव्यातून जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन सरकारवर जोरदार हल्ला चढवण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.