Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा पुकारला आहे. एकीकडे जरांगे आणि संबंध मराठा समाज आरक्षणासाठी ताकदीने रस्त्यावर उतरला आहे, तर सरकारी शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे यांनी अल्टिमेटम देत उपोषण तूर्त स्थगित केले आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे. यामुळे मराठा समाजाच्या भावना त्यांच्याविरोधात तीव्र झाल्या आहेत. यावर आता जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
मराठा आरक्षणाच्या विरोधात वकील सदावर्ते यांनी याचिका दाखल केली आहे, यावर तुमची भूमिका काय असा प्रश्न विचारले असता जरांगे म्हणाले, "मराठा समाजाचे आंदोलनं शांततेत झाले आहेत. कुणी काही दावा केल्याने त्यावर न्यायालय निर्णय देत नाही. न्यायालय आमच्या बाजूनं न्याय करेल. त्यांनी (गुणरत्न सदावर्ते) यांनी कसलीही भूमिका घेतली तरी आम्हाला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांना काय करायचं ते करू द्या. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे जो तो बोलतो," असं जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र होत असतानाच आता मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटलांच्या सभांवरही जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यानंतर आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्याची घटना घडली. आता सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे सदावर्ते आणि आंदोलक यांच्यातील वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे.