Maratha Aarakshan Mumbai Protest : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील सहा महिन्यांपासून लढा देत आहेत. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जरांगेंशी सरकारच्या वतीने अनेक शिष्टमंडळांनी चर्चा केली.
यात माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांनीही सरकारच्या वतीने वारंवार शिष्टाई केली. आता जरांगे-पाटील मुंबईतील आंदोलनासाठी रवाना झाले आहेत. यानंतर कडूंनीही आपण आंदोलनाला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आधी सरकारच्या वतीने शिष्टाई केलेल्या कडूंनी आरक्षणासाठी थेट आंदोलनातच उडी घेतली की काय, अशी चर्चा सुरू आहे.
अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी दोन दिवसांपूर्वी कडूंनी जरांगेंशी चर्चा केली. त्यावेळी जरांगेंनी प्रमाणपत्र देण्याबाबत अधिकारी चालढकल करीत असल्याची काही उदाहरणे दिली. त्यावर कडूंनी थेट जिल्हाधिकऱ्यांना फोन करून सुनावले होते. या काळात कडूंनी, सरकार आणि जरांगे यांच्यात संवाद घडवून आणण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली. आता जरांगे-पाटील आंदोलकांसह मुंबईकडे पायी रवाना झाले आहेत. या आंदोलनात मीही सहभागी होणार असल्याचे कडूंनी स्पष्ट केले.
बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, 'तीन-चार दिवस जालना-मुंबई अशा वाऱ्या केल्या. यात जरांगेंनी सांगितलेल्या अनेक मुद्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. त्यात नोंदी सापडलेल्यांच्या सग्या-सोयऱ्यांच्या मुद्यावर निर्णय घेतला आहे. मात्र जरांगेंनी नोंदी सापडलेल्या 54 लाख लोकांना 20 जानेवारीपर्यंत प्रथम प्रमाणपत्र द्यावे, सग्या-सोयऱ्यांचे नंतर पाहू, अशी भूमिका घेतली. दरम्यान, महसूल विभागाने प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहेत.'
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'आता जरांगे-पाटील (Mano Jarange) आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी ते अंतरवाली सराटीतून पायी रवाना झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाला यश यावे, समाजाचे भले व्हावे. या पदयात्रेत सहभाही होणार आहे. मुंबईतील आंदोलनात जाणार आहे. मात्र माझ्यावर असलेल्या केसेसच्या तारखा सांभाळून आंदोलन करणार आहे,' असेही बच्चू कडूंनी यावेळी स्पष्ट केले.
सरकार आणि जरांगेंशी झालेल्या चर्चेवर कडू म्हणाले, 'आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी बोलणी केली. मात्र आमच्या शिष्टाईपेक्षा जरांगेंचा दृष्टिकोन वेगळा आहे. समाजाचे कुठल्याही परिस्थितीत भले झाले, यावर ते ठाम आहेत. त्यांच्यासाठी सरकार दोन पावले मागे गेले, वारंवार चर्चा केली. येथेच जरांगेंनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे. आता ज्या नोंदी सापलेल्या आहेत त्यांना जातीचे दाखले मिळाले पाहिजेत,' असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आरक्षणासाठी सरकारने प्रशासनाला कामाला लावले आहे. दररोज हजारो नोंदी सापडतात. दिलेले आरक्षण कोर्टात टिकावे, अशी सरकारची भूमिका असल्याने थोडा जास्त वेळ लागत आहे. असे असतानाही जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम राहिल्याने काही मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
आता मनोज जरांगेंशी चर्चा करायची नाही, त्यांनी मुंबईत येऊन आंदोलन करावे, अशी भूमिकाच सरकारने घेतल्याने वाद वाढण्याची शक्यता आहे. यावर कडू म्हणाले, 'आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे. आता आंदोलक म्हणून मी तेथे जात आहे. सरकार काय भूमिका घेते, याबाबत काही माहिती नाही,' असे म्हणत कडूंनी ते मराठा आंदोलक असल्याचे स्पष्ट केले.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.