Bacchu Kadu : मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदीवरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला आहे. ओबीसी नेते राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात आणि मराठवाड्यात सापडत असलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचा आरोप करत या सगळ्या नोंदी रद्द करा, अशी मागणी एल्गार मेळाव्यातून केली होती. यावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्याकडून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत.
यात आता आमदार बच्चू कडू हे मनोज जरांगे यांच्या बाजूने भुजबळांना भिडले आहेत. छत्रपती संभाजीनगरात मराठवाड्यात आढळलेल्या कुणबी नोंदीची माहिती देताना त्यांनी छगन भुजबळ काय बोलत आहेत, त्यावर आपण बोलणार नाही. एकीकडे जुन्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे, दुसरीकडे या सर्व नोंदी बोगस असल्याचे भुजबळ सांगत आहेत. या नोंदी बोगस असल्याचे वाटत असेल तर त्यांनी येथे यावे, नोंदी तपासाव्यात.
या नोंदी बोगस असतील तर अधिकाऱ्यांना अन् मलाही फाशी द्या, अशा शब्दात बच्चू कडू यांनी भुजबळांना पत्रकार परिषदेत आव्हान दिले. दरम्यान राज्यात 54 लाख तर मराठवाड्यात 31 हजार कुणबी नोंदी आढळल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. राज्यात आढळलेल्या एकूण कुणबी नोंदी पैकी मराठवाडा विभागात 14 हजार कुणबी प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत. आढळलेल्या नोंदीतून अधिकाधिक लोकांना प्रमाणपत्र मिळावे, यासाठी 17 व 18 जानेवारीदरम्यान गावागावांत दवंडी पिटली जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ग्रामपंचायतींत याद्या लावून, अर्ज भरून घेतले जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी येथील विभागीय आयुक्तालयात आढावा घेतला. आतापर्यंत सापडलेल्या कुणबी नोंदी ग्राह्य धरून त्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. अनेक जुन्या पुराव्यात अर्धवट नोंदी आहेत, अशा लोकांच्या वंशावळी शोधणे तसेच पूर्वीच्या काळी विविध देवस्थान, पुजारी यांच्याकडे असलेली माहिती ग्राह्य धरण्यासाठी लवकरच अधिसूचना काढण्यात येईल.
मराठवाड्यात कोतवाल बुक आणि जन्मनोंदी सापडण्यास अडचणी येतात, त्याचे शोधकाम सुरु आहे. आतापर्यंत सापडलेल्या नोंदी आणि शासनातर्फे सुरु असलेल्या कामाची माहिती जरांगे यांना देण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर ते म्हणतील तसे पुढे जाण्याचे सरकारचे धोरण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.