Maratha Reservation Latest News Antarwali Sarati :
मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली साडेपाच महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मराठा आंदोलकांना थेट अध्यादेशाचा कागद दिला आणि मुंबईत धडकणारं मराठ्यांचं वादळ माघारी फिरलं. विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढलेल्या अध्यादेशाची चिरफाड ओबेसी नेते व सरकारमधील मंत्री छगन भुजबळ करीत होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला, या आनंदात मराठा समाज माघारी परतला. पण भुजबळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी सरकारच्या अध्यादेशावरून उपस्थित केलेले प्रश्न, शंकाकुशंका यामुळे मराठा समाजानेही या निर्णयाचा सर्व बाजूंनी विचार केला. मराठ्यांच्या पदरात आरक्षणाच्या कायद्याचा कागद, 54 लाख नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र, सग्यासोयऱ्यांना शपथपत्राआधारे आरक्षण हे Manoj Jarange-Patil यांच्या आंदोलनाचेच यश. आता फक्त सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाली तर खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला, असे म्हणता येईल.
मनोज जरांगे-पाटील यांचे काल अंतरवाली सराटीत आगमन झाल्यावर स्वागत आणि विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. पण आज दुपारी घेतलल्या पत्रकारपरिषदेत मनोज जरांगे-पाटील यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले. वाशी ते अंतरवाली सराटीदरम्यान, माध्यमांवरील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया, कायदेतज्ज्ञांनी मांडलेल्या भूमिका या सगळ्यांचा विचार करीत जरांगे पाटील यांनी काही निर्णय घेतले. ते किती महत्त्वाचे आणि जरांगे-पाटील यांच्यातील समयसूचकता दाखवणारे आहेत, हे स्पष्ट होते.
प्रामाणिकपणा, पारदर्शकता या जोरावर मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारचे सगळे डावपेच उधळून लावत समाजाच्या मागण्या मान्य करून घेतल्या. आता पुन्हा दगाफटका नको, त्याच त्याच मागण्यांसाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी जरांगे-पाटील यांनी आता अधिक सावधानता बाळगण्याचे ठरवले आहे. अंतरवाली या आपल्या आरक्षणाच्या कर्मभूमीतून जाहीरपणे नव्या कायद्यानुसार पहिले प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत विजयी सभा न घेण्याची घोषणा जरांगे यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नव्या कायद्यानुसार ठरल्याप्रमाणे सगेसोयरे यांना शपथपत्राच्या आधारे पहिले प्रमाणपत्र हाती पडेपर्यंत विजयाचा गुलाल उधळणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. यामुळे सरकारवर आता अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करणे आणि ठरल्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करणे याची जबाबदारी असणार आहे. जरांगे-पाटील यांनी वाशी सोडताना मुख्यमंत्र्यांच्या समक्ष मराठ्यांनी टाकलेल्या विश्वासाचा आणि उधळलेल्या गुलालाचा मान राखा, असे स्पष्टपणे सांगितले.
याचाच अर्थ अध्यादेश काढून मराठा समाजाची बोळवण करू नका, तर त्याचे कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करा, नाहीतर पुन्हा उपोषणासाठी मी मुंबईत आलोच म्हणून समजा, हा इशाराही दिला. एकूणच मनोज जरांगे-पाटील यांनी आपली आणि मराठा समाजाची कुठल्याही प्रकारची फसवणूक सरकारकडून केली जाऊ नये, याची काळजी घेतल्याचे दिसून आले. मुंबईकडे लाखो मराठा आंदोलकांना घेऊन निघाल्यानंतर ठोस निर्णय घेणे गरजेचे होते.
सरकारने दोन पावलं पुढे टाकली, तेव्हा जरांगे यांनाही काही भूमिका घेणे आवश्यक होते. तशी ती आणि त्यांच्या शिष्टमंडळाने घेतली आणि एका ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. अंतरवालीत परतल्यानंतर आज मनोज जरांगे-पाटील यांनी जी भूमिका जाहीर केली, ती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सरकारला अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर आणि त्याची अंमलबजावणी करावीच लागेल, एवढे मात्र निश्चित.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.