Jalna News : मराठा आरक्षणाच्या मागणीला किंवा त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला जर आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला असेल तर ते चुकीचे आहे. जरांगे पाटील यांनी या संदर्भात माझ्याकडे बोलतांना नाराजी व्यक्त केली. वडेट्टीवार काय बोलले, कधी बोलले हे मला माहित नाही, मी ऐकलेलं नाही. पण मी त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी काही तरी गैरसमज झाला आहे. मी मराठा आरक्षण किंवा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केला नाही, असे मला सांगितले असल्याचे जालन्याचे काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांच्या बेमुदत उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. विजयी झाल्यानंतर खासदार कल्याण काळे यांनी आज अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विजय वडेट्टीवार विरोध करतात याकडे काळेंचे लक्ष वेधले. तसेत त्यांना समज देण्यास सांगत नाहीतर विधानसभेत सगळं उलटं होईल, असा इशारा दिला.
या भेटीनंतर काळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आपल्याला फायदा झाला, अशी कबुली दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीला माझा पाठिंबा आहे. जरांगे यांना जास्त दिवस उपोषण करावे लागू नये यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करीन, असे आश्वासन काळे यांनी यावेळी दिले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या भुमिकेबद्दल जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. वडेट्टीवार (Vijay wadettiwar) मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल काय बोलले? हे मला माहित नाही. पण त्यांना मराठा आरक्षणाला, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केला असेल तर ते चुकीचे आहे. मी त्यांच्याशी फोनवर बोललो तेव्हा त्यांनी आपण कसलाच विरोध केला नाही. काहीतरी गैरसमज झाल्याचे मला सांगितले.
यावर वडेट्टीवार यांनी यासंदर्भात खुलासा करावा, अशी विनंती मी त्यांना केली आहे, असे काळे यांनी सांगितले. काळे यांच्यांशी झालेल्या चर्चेत निवडणुकीत आमच्या भोळ्याभाबड्या मराठा समाजाचा फायदा घ्यायचा, त्यांची मतं घेऊन निवडून यायचं आणि आणि निवडून आला की तुम्हाला मस्ती येते. मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही, अशी तुमची भाषा सुरू होते. ही भाषा कोणाची आहे, आता तुम्ही निवडून आलात, पण विधानसभेला सगळ्यांना पाडू एवढी ताकद गोरगरीब मराठ्यांमध्ये आहे, असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.