Beed Latest News : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (ता. २५) अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्या आंदोलनाला मराठवाड्यात जोरदार समर्थन मिळत आहे.
त्यामुळे सरकारने आता आंदोलनकर्त्यांमध्ये ‘बुद्धिभेद’ करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच यंत्रणा आणि सत्तापक्षांचे घटक या कामाला लागले आहेत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली. सुरुवातीच्या टप्प्यात अंबड तालुक्यातील गोदाकाठ व बीड जिल्ह्यातील गोदाकाठ म्हणजे गेवराई तालुक्यातून समाजबांधव नित्याने आंदोलनात सहभागी होते.
आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीचार्जमुळे आंदोलन चांगलेच गाजले. सरकारचीही मोठी नाचक्की झाली. यानंतर याचे पडसाद राज्य व मराठवाडाभर उमटले.
साखळी उपोषणे, लाक्षणिक उपोषणे, धरणे, मोर्चे आणि जाळपोळ असे आंदोलने झाली. दरम्यान, सरकारच्या विविध मंत्री व सत्तापक्षांच्या नेत्यांनी आंदेलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या वारंवार भेटी घेऊन आश्वासने दिली. मात्र, जरांगे उपोषणावर ठाम राहीले. सरकारने आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा वेळ मागून घेतल्यानंतर शेवटी १७ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला, पण या काळात त्यांनी मराठवाड्याचा दौरा करत ता. १४ ऑक्टोबरला अंतरवालीला ‘मराठ्यांची महासभा’ घेतली. सभा तर ‘ना भुतो ना भविष्यती’ अशीच झाली आणि महासभेपूर्वी व महासभेनंतरच्या त्यांच्या संवाद दौऱ्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला.
एकूणच समाजाच्या मनात सरकारबद्दल असलेली उबग आणि आरक्षणाची गरज यातून प्रतिध्वनीत झाली. मात्र, सरकारने ४० दिवसांचा वेळ पाळला नाही म्हणून पुन्हा जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार बाहेर काढले आहे.
त्यांच्या आवाहनानुसार मराठवाड्यात पुन्हा आंदोलन पेटले आहे. सर्कल व पंचायत समिती गणांच्या गावांत साखळी उपोषणांना सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणीही उपोषणे होत आहेत. यामुळे सरकार धास्तावले आहे. यासाठी आता सरकारने ‘बुद्धिभेदा’चे अस्त्र बाहेर काढले आहे.
यंत्रणांकडून आंदोलनातील प्रमुखांचे मोबाईल क्रमांक गोळा केले जात आहेत. यात प्रामुख्याने मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्यांवेळी आघाडीवर असलेल्यांवर फोकस करण्यात आला आहे. आंदोलनातील एकेकांना फोन करून वेगवेगळी माहिती देऊन आंदोलनांतील संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
तसेच सत्तापक्षांसाठी काम करणाऱ्या संघटना व त्यांचे पदाधिकारीही याच कामात गुंग आहेत, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी जाधव यांनी दिली. याला नाव न छापण्याच्या अटीवर बड्या अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला. यात विशेषत: भाजपसाठी काम करणाऱ्या संघटना आघाडीवर असून, त्यांनी असा ‘अंधारी कावा’ सुरू केला आहे. आंदोलकांमध्ये जाऊन याचा कानोसा घेतल्यानंतर असे घडल्याचे स्पष्ट झाले. मात्र, सरकारच्या या ‘निती’चा फारसा फरक पडत नसल्याचेही दिसत आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.