Marathwada Drought : मराठवाड्यात पालकमंत्र्यांकडून 'एकाच' दुष्काळी दौऱ्याचा सोपस्कार : पंचनाम्याचे आदेश देत विषय संपवला; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

Marathwada drought-hit farmers await relief as damage assessments: मराठवाड्यात दुष्काळामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असून पालकमंत्र्यांनी विविध जिल्ह्यांत पाहणी करून पंचनाम्याचे आदेश दिले. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याची प्रतीक्षा कायम आहे.
Marathwada drought-hit farmers await relief as guardian ministers conduct crop inspections
Marathwada drought-hit farmers await relief as guardian ministers conduct crop inspectionsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Drought: राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाण्याची आणि चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. खरीप पिके करपली असून अनेक भागांत शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या भागांमध्ये पंचनामे आणि नुकसानीचे मूल्यांकन सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मात्र, दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या बांधावर एकदाच गेलेले पालकमंत्री पुन्हा किती वेळा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले? शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किती पाठपुरावा केला?असा सवाल आता उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील लातूर, धाराशिवसह दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. त्यांच्यासोबत संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्रीही उपस्थित होते. त्यानंतर काही पालकमंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील आढावा दौरे उरकले. शेतकऱ्यांशी संवाद साधला, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आणि तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. पण दौरा झाला, पाहणी झाली, आदेश दिले आणि त्यानंतर पुढे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर कायम आहे. शेतकऱ्यांना सध्या तातडीच्या मदतीची प्रतीक्षा आहे.

अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री हे सरकार आणि शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. त्यामुळे केवळ एकदा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेण्यापेक्षा मदतीची अंमलबजावणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आहे की नाही, याचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे अशी भावना मराठवाड्यातील लोकांमधून व्यक्त होत आहे.

संजय शिरसाट : वैजापूरमध्ये पाहणी, पंचनाम्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी २० सप्टेंबर रोजी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश देत त्यांनी पाहणी दौरा आटोपला. मात्र, जिल्ह्यातील इतर भागांमध्येही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा दावा केला जात असताना पुढील टप्प्यात प्रशासनाकडून पंचनामे किती वेगाने झाले आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, हा प्रश्न कायम आहे.

Marathwada drought-hit farmers await relief as guardian ministers conduct crop inspections
MPSC Students Morcha : MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! सचिव, अध्यक्षांच्या राजीनाम्यावर ठाम, आज पुण्यात मोर्चा; काँग्रेसचा पाठिंबा

पंकजा मुंडेंचा जालन्यात दौरा; पुढची पाहणी कुठे?

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ३० सप्टेंबर रोजी बदनापूर तालुक्यातील कडेगाव, गेवराई बाजार, गोकुळवाडी तसेच जालना तालुक्यातील गणेशनगर शिवारात पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांची अडचण समोर आल्यानंतर पंचनामे आणि मदतीची प्रक्रिया पुढे नेणे हे आता प्रशासनासमोरील आव्हान आहे.

बीडमध्ये सुनेत्रा पवार; त्यानंतर बारामतीकडे?

बीड जिल्ह्यात २६ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकसानग्रस्त शेतांवर जाऊन सोयाबीनसह खरीप पिकांची पाहणी केली. पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यानंतर त्या बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत व्यस्त झाल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळग्रस्त बीडमधील पंचनामे आणि मदतीच्या प्रक्रियेचा पुढील पाठपुरावा कोण करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

शिवेंद्रसिंहराजे फडणवीसांसोबतच; स्वतंत्र दौरा नाही

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी २३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संयुक्त दुष्काळ पाहणी दौरा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाऊ आणि खरोसा परिसरातील शेतांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली होती. या दौऱ्यात पालकमंत्रीही उपस्थित होते. यानंतर ते सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सक्रिय असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लातूरच्या दुष्काळी परिस्थितीचा पुढील आढावा कधी घेतला जाणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रताप सरनाईकांचा धाराशिवमध्ये आढावा

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी १७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील पाणीटंचाई, चारा आणि पीक नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातही ते सहभागी झाले. मात्र, जिल्ह्यातील परिस्थिती कायम असताना पालकमंत्र्यांकडून पुढील टप्प्यातील प्रत्यक्ष पाहणी आणि मदतीच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा किती होतो, याकडे आता लक्ष आहे.

अतुल सावे नांदेडमध्ये; प्रशासनाला पंचनाम्यांचे आव्हान

नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी २७ सप्टेंबर रोजी दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा दौरा केला. त्याआधी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही नांदेड आणि बीडमधील परिस्थितीची पाहणी केली होती. नांदेडमधील मुखेड आणि मुदखेड तालुके दुष्काळी मदतीच्या यादीतून वगळल्याने स्थानिक पातळीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मेघना बोर्डीकर, नरहरी झिरवाळ यांचेही पाहणी दौरे

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी २४ सप्टेंबर रोजी सेलू, पाथरी, मानवत आणि परभणी तालुक्यांतील शिवारात जाऊन पिकांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी १६ सप्टेंबर रोजी सेनगाव तालुक्यातील मानसपिंप्री परिसरात करपलेल्या खरीप पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

Marathwada drought-hit farmers await relief as guardian ministers conduct crop inspections
Congress vs Uddhav Thackeray : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना धोका, 'मविआ'त फूट? अमरावतीने समीकरण बदलले...

म्हणजेच जवळपास सर्वच जिल्ह्यांत पालकमंत्र्यांनी दुष्काळाची पाहणी केली आहे. पण आता खरी कसोटी पाहणीची नाही, तर त्या पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत किती लवकर पोहोचते याची आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या असून जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी प्रश्न कागदावरील घोषणेचा नाही, तर मदत प्रत्यक्ष कधी मिळणार याचा आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या बांधावर जाणे हा सोपस्कार राहु नये एवढीच माफक अपेक्षा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com