Marathwada Graduate Constituency nomination : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी एक उमेदवार चक्क प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तिरडीवर दाखल झाल्याचा अजब प्रकार समोर आला. रमेश पाटील नावाच्या या उमेदवाराने आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पण तो दाखल करण्यासाठी ते चक्क तिरडीवरून आले.
एखादी खरी अंत्ययात्रा वाटावी अशा पद्धतीने रमेश पाटलांनी वाजत-गाजत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली. हा आगळा-वेगळा प्रकार पाहून सगळेच चकित झाले, परंतु पोलिसांनी रमेश पाटील यांना तिरडीवरून उतरवले, तिरडी जप्त करत त्यांच्या गळ्यातील हार काढून घेतला. त्यानंतरच त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाण्यासाठी परवानगी दिली.
अर्ज दाखल करण्यासाठी जाणारे रमेश पाटील हे राज्यभरात नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना फोन लावून त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्यासाठी राज्यभरात ओळखले जातात. आतापर्यंत शेकडो राजकीय नेते, पुढाऱ्यांना फोन लावून त्यांनी जाब विचारल्याच्या ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
स्टंटबाजी नाही, उद्विग्नता..
रमेश पाटील यांनी तिरडीवर जाऊन अर्ज दाखल करण्याच्या या निर्णयावर स्टंटबाजी म्हणून टीका केली जात आहे. परंतु ही स्टंटबाजी नाही तर उद्विग्नता, आतापर्यंत पदवीधरच्या आमदाराने अठरा वर्षात विद्यार्थी, पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही न केल्याचा संताप व्यक्त करण्यासाठी घेतलेला हा निर्णय असल्याचे रमेश पाटील यांनी म्हटले आहे.
"पेपरफुटीच्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात शेकडो विद्यार्थी, शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र या विषयावर पदवीधरांचे नेतृत्व करणाऱ्या आमदाराने अठरा वर्षात कधी तोंड उघडले नाही. ते शांत राहिले. त्याचा निषेध म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिरडीवरून येण्याचा निर्णय घेतला. वर्षानुवर्ष त्याच व्यक्तीला निवडून देणाऱ्या मतदारांनी आता याचा विचार करावा. जर त्यांना अशाच लोकांना वारंवार निवडून द्यायचे असेल तर माझे काही म्हणणे नाही, त्यांनाच मतदान करा," असा संतापही रमेश पाटील यांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.