

BJP Rajya Sabha candidates : भाजपकडून माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या कुटुंबाला झटका दिला आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या उत्तर प्रदेशातील आठ राज्यसभा उमेदवारांमधून चंद्रशेखर यांचे पुत्र खासदार नीरज शेखर यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे मागील ३७ वर्षांनंतर पहिल्यांदाच शेखर कुटुंबातील एकही सदस्य संसदेच्या कोणत्याच सभागृहात दिसणार नाही.
मागील चार दशकांपासून चंद्रशेखर यांच्यासह कुटुंबाचा संसदेत दबदबा होता. उत्तर प्रदेशातील बलिया लोकसभा मतदारसंघ हा त्यांचा गड होता. तसेच काही वर्षांपर्यंत राज्यात चंद्रशेखर यांच्या नावाचा करिष्मा होता. त्यानंतर त्यांचे पुत्र नीरज शेखर यांनीही सातत्याने संसद गाजविली आहे. नीरज शेखर हे दोनदा लोकसभेत आणि तीनवेळा राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. मात्र, यावेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नीरज शेखर यांना उमेदवारी न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. चंद्रशेखर यांच्या कुटुंबाची आता भाजपला गरज नाही का, असे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. चंद्रशेखर आणि त्यांच्यापाठोपाठ नीरज शेखर यांनी पूर्वांचल भागातील ठाकूर समुदायात आपला दबदबा निर्माण केला होता. मात्र, मागील काही वर्षांतील राजकीय समीकरणे बदलली असून नीरज शेखर यांचा प्रभावही ओसरल्याची चर्चा आहे.
चंद्रशेखर यांच्या निधनानंतर झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीनंतर नीरज शेखर हे पहिल्यांदा समाजवादी पक्षाकडून लोकसभेत दाखल झाले. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर सपाने त्यांना राज्यसभेत पाठविले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपाने त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षालाही सोडचिठ्ठी दिली.
सपामधून बाहेर पडल्यानंतर नीरज शेखर यांनी भाजपची वाट धरली. भाजपनेही त्यांना राज्यसभेत संधी दिली. २०२४ मध्ये भाजपने त्यांना बलिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला होता. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारीही देण्यात आलेली नाही. त्यामुळे पहिल्यांदाच चंद्रशेखर कुटुंबातील एकही सदस्य ३७ वर्षांनंतर पहिल्यांदाच संसदेच्या कुठल्याच सभागृहात असणार नाही.
दरम्यान, चंद्रशेखर यांची संसदीय राजकारणाची वाटचाल १९६२ पासून सुरू झाली. काँग्रेसमधून ते पहिल्यांदा राज्यसभेत दाखल झाले. त्यानंतर सातत्याने ते देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिले. आणीबाणीच्या काळात त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी १९७७ मध्ये बलियातून लोकसभेत पाऊल ठेवले. १९८४ मध्ये मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
त्यानंतर १९८९ ते २००४ अशा सलग सहा निवडणुकांमध्ये त्यांनी बलियाचे नेतृत्व केले. ते २००७ पर्यंत लोकसभेत खासदार होते. ते १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१ दरम्यान देशाचे आठवे पंतप्रधान होते. म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनानंतर नीरज शेखर यांची राजकीय वाटचाल सुरू झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.