Satish Chavan: उमेदवार महायुतीचे, पण सतीश चव्हाण यांचे एकला चलो रे; भाजपाही प्रचारापासून अलिप्त

Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारात भाजपच्या सहभागाबाबत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार, बंडखोरी आणि भाजपच्या मतांमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे चर्चेत आली आहेत.
Satish Chavan
Satish ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathvada politics News: मराठवाडा पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने सतीश चव्हाण यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी स्थानिक इच्छुकांनी प्रयत्न केले, बंडाचे निशाण फडकवले मात्र राज्य पातळीवर कराव्या लागणाऱ्या तडजोडीनुसार विद्यमान आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच ही जागा सोडण्यात आली.

भाजपचे एम.के. देशमुख यांनी घेतलेली माघार आणि भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते विनोद तावडे यांच्या भेटीनंतर माजी आमदार संजय केनेकर यांनी घेतलेली नमती भूमिका सतीश चव्हाण यांच्या पथ्यावर पडेल असे चित्र रंगवले गेले.

या आधीच्या तीनही मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी भाजपच्या श्रीकांत जोशी आणि शिरीष बोराळकर यांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे महायुती असली तरी सतीश चव्हाण यांची निवडणुकीत 'एकला चलो' ही भूमिका कायम दिसते. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर खुलताबाद मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी सतीश चव्हाण यांनी थेट पक्षांतर केले होते.

शिक्षक संघटना, मराठवाडा पदवीधर व शिक्षक मतदार संघाला आमदार नको अशी भूमिका घेतलेल्या भाजपचे तीन टर्म आमदार असलेल्या प्रशांत बंब यांना धडा शिकवण्यासाठी सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. मात्र त्यांचा हा प्रयोग प्रशांत बंब यांनी त्यांच्यावरच उलटवला.

उलट आता बंब हे त्यांच्या विरोधात अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिक्षक मुख्यालयात न राहण्याचा मुद्दा उपस्थित करत बंब यांनी राज्यभरातील शिक्षक संघटना, शिक्षक व पदवीधर आमदारांना एकाच वेळी अंगावर घेतल्याचे दिसून आले होते. आपला हा लढा यापुढेही सुरूच राहणार असेही बंब यांनी स्पष्ट केले आहे.

चव्हाण यांना नको युतीच्या कुबड्या?

सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना औपचारिकता म्हणून प्रशांत बंब हे हजर होते. मात्र अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच सतीश चव्हाण यांनी तीन टर्म निवडणूक यंत्रणा राबवण्याचा दांडगा अनुभव असल्याने प्रचाराला स्वतंत्रपणे सुरुवात केली होती. चव्हाण हे महायुतीचे उमेदवार असले तरी ते स्वबळावरच ही निवडणूक लढवत असल्याचे चित्र आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेला मराठवाडा पदवीधर मतदार संघ पुन्हा भाजपकडे खेचून आणण्याचा प्रयत्न असलेल्या भाजपच्या नेत्यांमध्येही या निवडणुकीबद्दल फारसा उत्साह दिसून येत नाही. भाजपा सतीश चव्हाण यांच्या प्रचारापासून पूर्णपणे अलिप्त आहे. अर्थात चव्हाण यांच्यासाठी ही काळजी करणारी गोष्ट म्हणावी लागेल.

Satish Chavan
Shivsena UBT : ठाकरेंच्या पक्षातील महापालिकेच्या गटनेत्याला अटक; भूखंडाच्या वादातून दोन गटात हाणामारी

महाविकास आघाडीची तिरकी चाल

सतीश चव्हाण यांना यावेळी धोबीपछाड देण्याची संधी महाविकास आघाडीला चालून आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलीप घुगे या नव्या ओबीसी चेहऱ्याला उमेदवारी देत मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये पहिल्यांदाच मराठा विरुद्ध ओबीसी असे कार्ड खेळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत ही निवडणूक दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीवर जावी असा डाव टाकल्याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे.

प्रतापसिंह पाटील यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय मराठवाड्यातील मोठ्या शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या संस्थाचालकांच्या भेटीगाठींवरही त्यांनी जोर दिला आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघात सर्वाधिक नोंदणी करत सतीश चव्हाण यांनी आपली बाजू भक्कम केली असली तरी महाविकास आघाडीची रणनीती, भाजपाची तटस्थ भूमिका पाहता निवडणुकीचे चित्र बदलू शकते अशी चर्चा रंगू लागली आहे.

भाजपाची मते कोणाला?

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या जागेवर दावा करताना भाजपच्या संजय केनेकर यांनी आम्ही दोन लाख नोंदणी केल्याचा दावा केला होता. तर सतीश चव्हाण यांच्या विरोधात बंडाचे निशाण हाती घेत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या एम. के. देशमुख यांनीही दीड लाख मतदार नोंदणी झाल्याचा दावा केला होता. आता भाजपाची ही मते नेमकी कोणाला जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Satish Chavan
Latur DCC Bank : भाजपच्या विरोधानंतरही लातूर जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटलांची भूमिका निर्णायक

यापूर्वीच्या तीनही निवडणुका भाजपाचा पराभव करून जिंकलेल्या सतीश चव्हाण यांना भाजपच्या मतांची खरंच गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या एकला चलो भूमिकेवरून स्पष्ट होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवत अपशकून करू पाहणाऱ्या सतीश चव्हाण यांना युती धर्माची आठवण करून देत भाजप पडद्यामागून धडा शिकवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सध्याच्या प्रचारात सतीश चव्हाण यांनी आघाडी घेतल्याचे चित्र असले तरी मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्ये असलेली शांतता, महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी होऊनही सुरू असलेला प्रचार या घटनांकडे अगदीच दुर्लक्ष करून चालणार नाही. मित्र पक्षांची शांतता ही वादळापूर्वीची शांतता ठरू नये, याची काळजी सतीश चव्हाण यांना घ्यावी लागणार आहे. 41 उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत प्रमुख लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार आहे.

महाविकास आघाडीच्या डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याने सतीश चव्हाण यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कधीकाळी एकत्र काम केलेल्या राजेश टोपे, फौजिया खान यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी आता महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रतापसिंह पाटील यांच्या मागे ताकद उभी केली आहे. शिवाय पाटील हे स्वतः संस्थाचालक असल्याने नवा चेहरा म्हणून पदवीधर मतदारांची त्यांना पसंती मिळताना दिसत आहे. एकूणच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण हे तगडे उमेदवार असले तरी एक छोटीशी चूक त्यांना महागात ठरू शकते, असे सध्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com