

Marathwdda Politics : मराठवाड्यातील भीषण दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्यांना अद्याप सरकारकडून न झालेली मदत, ग्रामीण तसेच शहरी भागाला पाणी टंचाईचा भेडसावणारा प्रश्न आणि सर्वच क्षेत्रावर दुष्काळाचा होत असलेला परिणाम मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतदानावरही दिसून आला. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ६५ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली होती. यंदा हे प्रमाण ५८.६७ टक्क्यापर्यंत घसरले आहे.
आता घटत्या मतदानाचा फटका तीन टर्म आमदार असलेल्या आणि विजयी चौकार ठोकण्याच्या तयारी असलेल्या महायुतीच्या सतीश चव्हाण यांना बसणार, की मग महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परिवर्तनाचा दावा करणाऱ्या डाॅ. प्रतापसिंह पाटील यांना? हे २७ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विरोधकांनी तीन टर्म आमदार असलेल्या सतीश चव्हाण यांना 'अठरा वर्षात काय केले'? हा प्रचाराचा मुद्दा केला होता.
यावर सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी डॅमेज कंट्रोलचा बराच प्रयत्न केला. केलेल्या कामाचे प्रगतीपुस्तक, कार्यपुर्ती अहवाल मतदारांसमोर ठेवत प्रचार सभांमधून उत्तरेही दिली. ४१ उमेदवार निवडणुक रिंगणात असल्यामुळे मतपत्रिका मोठी झाली, त्याची घडी देखील मोठी होत असल्याने ही मतपत्रिका पेटीत टाकतांना बरीच कसरत करावी लागत असल्याची तक्रार सतीश चव्हाण, प्रतापसिंह पाटील या दोन प्रमुख उमेदवारांनी मतदानादरम्यान केली होती. जिथे मतदानाला दोन ते तीन मिनिटे लागायला हवी, तिथे पंधरा ते वीस मिनिटे लागत असल्याचे बोलले गेले. याचा परिणामही मतांची टक्केवारी घटण्यात झाल्याचा अंदाज आहे.
समोर आलेल्या आकडेवारीनूसार सर्वाधिक ६२.५३ टक्के मतदान हे सतीश चव्हाण यांच्यासाठी फायद्याचे ठरणाऱ्या धाराशिव जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी मतदानाची नोंद ही ५५.५३ एवढी चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदवले गेले. मतदाना दरम्यान, सतीश चव्हाण यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये विक्रमी मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.
चव्हाण यांची निवडणूक यंत्रणा अत्यंत प्रभावी आहे, असे बोलले जाते. या जोरावरच त्यांनी आतापर्यंत या मतदारंसघातून तीनवेळा विजय मिळवला आहे. मग मराठवाडा पदवीधरसाठी मतदानाला वेळ लागत असला, मतपत्रिका मोठी असली तरी विक्रमी मतदान होणार, हा त्यांचा अंदाज कसा चुकला? जर त्यांचा हा अंदाज चुकला तर मग निकाल काय असेल? याबाबत त्यांचे काय मत आहे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आठही जिल्ह्यांत मिळून ५८.६७ टक्के मतदान झाले आहे. शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख २६ हजार ७०० मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानात सुमारे सहा टक्क्यांची घट झाली आहे.
मतदानाच्या टक्केवारीचा विचार करता धाराशिव जिल्हा ६२.५३ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांतही ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. जालना आणि नांदेडमध्ये प्रत्येकी ५९.८ टक्के मतदान नोंदविण्यात आले, तर बीडमध्ये ५९.७ टक्के मतदान झाले.लातूरमध्ये ५६.५० टक्के, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ५५.७३ टक्के मतदान झाले.या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ९३ हजार ३१८ मतदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होते. त्यामुळे मतदानाचा टक्का सर्वांत कमी असला, तरी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्यांची संख्या या जिल्ह्यात सर्वाधिक राहिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.