

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या शक्तिप्रदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला गालबोट लागले. महिनाभरापूर्वी नियोजित असलेला हा मेळावा एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे पुढे ढकलण्यात आला होता. रविवारी शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला; मात्र त्याआधी आणि मेळाव्यादरम्यान घडलेल्या घटनांनी परभणीच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे अकरावे बेमुदत उपोषण २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत सुरू आहे. याच काळात परभणीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे हे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर आक्रमक आहेत.
या पार्श्वभूमीवर मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच जरांगे पाटील यांनी संजय जाधव यांना थेट फोन केला. कार्यक्रम रद्द करा, अन्यथा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. नेत्यापेक्षा समाज मोठा नाही का, असा सवाल करत त्यांनी शिंदे यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला.
कार्यक्रम रद्द न केल्यास आपण स्वतः परभणीत येऊ, असा इशाराही जरांगे यांनी दिला. सरकार आणि आयोजकांकडून राज्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास जरांगे आणि संजय जाधव यांच्यात हा संवाद झाला. काही तासांतच परभणीचे वातावरण तापले.
दुसरीकडे, शेतकरी मेळाव्याची वेळ सकाळी ११ वाजताची होती. एकनाथ शिंदे ठाण्याहून परभणीकडे रवाना झाले होते. जरांगे पाटील यांनीही परभणीकडे जाण्यासाठी तयारी केली होती. मात्र, परभणी गाठण्यासाठी लागणारा वेळ आणि तोपर्यंत सभा संपण्याची शक्यता लक्षात आणून दिल्यानंतर जरांगे यांनी परभणीला जाण्याचा निर्णय बदलला. मात्र, या प्रकरणावरून त्यांनी संजय जाधव यांना लक्ष्य करत, आता त्यांना गुलाल कसा लागतो हे मराठा समाज पाहील, असा इशारा दिला.
जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याचा परिणाम मेळाव्याच्या ठिकाणीही पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर काही मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. या विरोधाला शिंदे यांनी आक्रमक उत्तर देण्याऐवजी संयमाची भूमिका घेतली. हे आपलेच बांधव आहेत, त्यांना स्टेजवर घेऊन या, असे त्यांनी सांगितले.
संजय जाधव यांनीही या वादावर सावध भूमिका घेतली. मनोज जरांगे पाटील यांच्या भावनांचा आपण आदर करतो. मराठा आरक्षणासाठी त्यांची असलेली भूमिका आणि तळमळ आपल्याला मान्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सभा सुरू होण्याच्या काही तास आधी कार्यक्रम रद्द करणे शक्य नव्हते, असा खुलासा जाधव यांनी केला. सभा रद्द करण्याबाबत आदल्या रात्रीच फोन आला असता तर आपण नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असता, मात्र ऐनवेळी फोन आल्याने ते शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी आपल्या सरकारने आरक्षण दिल्याचा उल्लेख केला. मात्र, सभेच्या ठिकाणी झालेली घोषणाबाजी आणि काळे झेंडे यामुळे वातावरण शेवटपर्यंत पूर्णपणे निवळले नाही. विशेष म्हणजे, शिंदे यांचे भाषण सुरू असतानाच अखेरच्या टप्प्यात माईक बंद पडला. त्यामुळे नियोजित समारोप न करता त्यांना भाषण आटोपते घ्यावे लागले. दुसरीकडे, घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवणाऱ्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानेही गोंधळ निर्माण झाला.
आता मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमागे आणि या सगळ्या गोंधळामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणीचे आमदार राहुल पाटील आहेत का? असा सवाल विचारला जात आहे. मेळाव्याच्या आदल्या दिवशीच राहुल पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये बराचवेळी चर्चा आणि राहुल पाटील यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला.
त्यानंतर अवघ्या २४ तासांत जरांगे यांनी थेट संजय जाधव यांना फोन करून शिंदे यांचा कार्यक्रम रद्द करण्याचा इशारा दिला. त्यामुळे राहुल पाटील यांच्या भेटीचा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचा परभणीत वेगळाच अर्थ काढला जात आहे.
शिवाय मेळाव्याला विरोध करण्यासाठी मैदानात दाखल झालेल्या काही मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले. ही माहिती मिळाल्यानंतर आमदार राहुल पाटील पोलीस ठाण्यात पोहोचले. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावे, कोणालाही अटक करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्यातही काही काळ वातावरण तापले.
एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील हा मेळावा संजय जाधव यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम मानला जात होता. पक्षांतरानंतर परभणीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्यात आला होता. जिल्हाभरातून शेतकरी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना जमवण्याची तयारी करण्यात आली होती.
मात्र, ऐनवेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला विरोध, सभेत दाखवलेले काळे झेंडे, घोषणाबाजी आणि पोलिसांची कारवाई यामुळे जाधव यांना अपेक्षित असलेले राजकीय शक्तिप्रदर्शन काहीसे झाकोळले गेले. उलट या संपूर्ण प्रकरणामुळे मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांचा रोष संजय जाधव यांच्या विरोधात गेला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
परभणीच्या राजकारणात संजय जाधव आणि राहुल पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. दोघेही पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना त्यांच्यात अंतर्गत मतभेद होते. परभणी महापालिका निवडणुकीच्या काळात मात्र दोन्ही नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका घेतली.
विरोधकांना संधी मिळू नये आणि महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय झाला. त्याचा परिणाम म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस आघाडीने महापालिकेत सत्ता मिळवली. सय्यद इकबाल यांना महापौरपद देण्याचा निर्णय घेत संजय जाधव यांनी त्यावेळी वेगळा राजकीय संदेश दिला होता.
मात्र, काही महिन्यांतच जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर महापालिकेतील तब्बल १८ नगरसेवकांना आपल्या बाजूने खेचण्याच्या हालचालीही सुरू झाल्या. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात या नगरसेवकांचा पक्षप्रवेश घडवून आणून महापालिकेत सत्तांतर करण्याचा जाधव यांचा प्रयत्न असल्याची चर्चा होती.
संजय जाधव यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा चंग राहुल पाटील यांनी बांधला होता. याच पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्याच्या एक दिवस आधी राहुल पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची घेतलेली भेट महत्त्वाची ठरते. या भेटीनंतर अवघ्या एका दिवसात जरांगे यांनी संजय जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. त्यामुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात या दोन्ही घटनांचा संबंध जोडला जात आहे.
राहुल पाटील यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. जरांगे पाटील यांची भेट ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर समाजाच्या भूमिकेतून घेतली होती. त्यांचा परभणीतील मेळाव्याला असलेला विरोध आणि आपल्या भेटीचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी एवढा मोठा नाही की माझ्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटील कुणाला विरोध करतील. ती त्यांची स्वतःची भूमिका होती,’ असे राहुल पाटील यांनी सांगितले.
तसेच, मेळाव्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण पोलीस ठाण्यात गेलो होतो, त्याचा मेळाव्याला झालेल्या विरोधाशी संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल पाटील यांची जरांगेंशी भेट, त्यानंतर जरांगेंचा संजय जाधव यांना थेट फोन आणि पुढे परभणीतील मेळाव्यात झालेला विरोध... या घटनांची वेळ पाहता परभणीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
प्रत्यक्ष परभणीत संजय जाधव यांना विरोध करण्याऐवजी राहुल पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जाधवांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला का, अशी चर्चाही सुरू झाली आहे. अर्थात, राहुल पाटील यांनी या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या संजय जाधव यांच्या मेळाव्याला ऐनवेळी मिळालेला मराठा समाजाचा विरोध आणि त्यानंतर निर्माण झालेले राजकीय वातावरण हे जाधवांसाठी निश्चितच अस्वस्थ करणारे ठरले आहे.
आता मनोज जरांगे पाटील यांचा संजय जाधव यांच्यावरील रोष पुढेही कायम राहतो का, की दोन्ही बाजूंमध्ये संवाद होऊन हा वाद मिटतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच संजय जाधव स्वतः जरांगे पाटील यांची भेट घेऊन या वादावर पडदा टाकतात का, याकडेही परभणीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.