

Beed politics news: दीड वर्षांपूर्वी केज तालुक्यातील मसाजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या अमानुषपणे करण्यात आली त्याची छायाचित्रे बघून अनेकांचा थरकाप उडाला. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करत त्यांच्यावर बीडच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे.
मसाजोग ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातच नाही तर देश पातळीवर मस्साजोग गावाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यातच ग्रामपंचायतची निवडणूक लागल्याने या गावचा सरपंच कोण होणार? याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कायम दहशतीत वावरणाऱ्या देशमुख कुटुंबातील कोणी ग्रामपंचायत निवडणुकीत उतरणार का? याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
गावकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी माजी सरपंच अश्विनी देशमुख यांना निवडणुकीसाठी पुन्हा गळ घालण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अश्विनी देशमुख यांना सरपंच म्हणून गावचा कारभार हाताळण्याचा अनुभव आहे. 2017 ते 2022 दरम्यान त्या मस्साजोगच्या सरपंच होत्या तर त्याआधी त्यांनी उपसरपंच पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. केज बाजार समितीच्या सभासद म्हणूनही त्यांनी काम केलेले असल्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार पुन्हा त्यांच्या हाती यावा, असे प्रयत्न सुरू आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख, अश्विनी देशमुख यांच्यासह संपूर्ण कुटुंबच दहशतीच्या वातावरणात वावरत आहे. गेल्या वर्षभरात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तुरुंगात असलेल्या मुख्य आरोपी वाल्मीक कराड व इतरांच्या समर्थकांकडून देशमुख कुटुंबांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. वारंवार घडणाऱ्या या प्रकारामुळे देशमुख कुटुंब पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उतरणार की मग राजकारणापासून अलिप्त राहणार? हे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे.
अश्विनी देशमुख यांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तयार करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित लोक लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत अश्विनी देशमुख यांना पुन्हा सरपंच पदाच्या निवडणुकीत उतरवण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. संतोष देशमुख यांनी आपल्या सरपंचपदाच्या काळात जलसंधारण वृक्षारोपणासारखी अनेक सामाजिक विकास कामे केली होती. आजही गावकरी त्यांचे हे कार्य पुढे नेत आहेत. याच कार्यकर्त्यांकडून अश्विनी देशमुख यांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला जाणार असल्याची समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.