सुशांत सांगवे
Latur Congress Political News : महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांचा खर्च बुलेट ट्रेन किंवा समृद्धी महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांवर होऊ शकतो. तर मला ठाम विश्वास आहे महाराष्ट्रात येणारे महाविकास आघाडीचे सरकार आणि देशात येणारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकार लातूरसह मराठवाड्याची तहान नक्कीच भागवेल. मग त्यासाठी एक लाख कोटी रुपये लागले तरी चालतील. आमचे सरकार मराठवाड्याला हक्काचे पाणी देईल, असा विश्वास लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.
धीरज देशमुख ( Dhiraj Deshmukh) यांनी राज्यातील बहुतांश सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांची व्यासपीठावरील उपस्थिती पाहून लातूर आणि मराठवाड्याच्या दृष्टीने जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या पाण्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले. लातूरचा पाणीप्रश्न सोडवण्याला राज्यात येणाऱ्या नव्या महाविकास आघाडी सरकारने प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत धीरज देशमुख यांनी उपस्थितींची मने जिंकली.
काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा व विभागीय बैठक आज लातूरमध्ये पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीचा शंखनादच या मेळाव्यातून केला गेला. धीरज देशमुख यांनी मराठवाडा आणि राज्यातील प्रश्नांचा उहापोह करतानाच आपल्या भाषणात लातूरच्या पाणी प्रश्नाला महत्व देत तो सोडवण्यासाठी काहीही करा, अशी जाहीर भूमिका घेत लातूरकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला.
अति वेगाने गोव्याला जाण्यासाठी सध्याच्या सरकारने शक्तीपीठ महामार्ग करण्याचे धोरण स्वीकारले. जागतिक बँकेकडून 83 हजार कोटीचे कर्ज घेऊन हा महामार्ग ते करू पाहत आहेत. पण शेतकरी नाराज आहेत, आमच्या सुपीक जमिनी यामुळे हातातून जाणार, ही चिंता त्यांना सतावत आहे. (Latur) मार्ग असताना आणखी एक मार्ग सरकार लादत आहे. अशा मोठ्या प्रकल्पांवर इतका पैसा खर्च होत असेल तर मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी येणाऱ्या महाविकास आघाडीचे नवे सरकार नक्कीच वॉटर ग्रीडसारखे प्रकल्प पूर्ण करेल.
त्यासाठी 1 लाख कोटी लागले तरी चालतील, असे धीरज देशमुख म्हणाले. काँग्रेस पक्षाने मराठवाड्याला नेहमीच राज्याचे, देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. या नेतृत्वाने आपापल्या कार्यकाळात मराठवाड्याचाच नव्हे तर राज्याचा, देशाचा विकास साधण्यात योगदान दिले.
विलासराव देशमुखांनी विकासाची गंगा आणली..
मराठवाडा हा मागासलेला दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. पण विलासराव देशमुख यांच्याकडे महाराष्ट्राची धुरा आली तेव्हा त्यांनी मराठवाड्याबरोबरच विदर्भाचा मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. हा परिसर सुजलाम सुजलाम झाला पाहिजे यासाठी त्यांनी परिश्रम घेतल्याची आठवण धीरज देशमुख यांनी यावेळी उपस्थिताना करून दिली.
'मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. त्यामुळे मराठवाड्यात हे करता येत नाही', असे कारण अधिकारी पुढे करतात. त्यामुळे मराठवाड्याचा विकास खुंटला जातो. पण विलासराव देशमुख यांनी येणारे अडथळे दूर करून येथे विकासाची गंगा आणण्याचे काम केले. 'काँग्रेस का हाथ आम आदमी के साथ' हा विचार समोर ठेवून विलासराव देशमुख यांनी राज्याचा विकास साधला. प्रत्येक भागाला समान स्थान दिले.
शेतकरी सुखी व्हावा असे सत्ताधाऱ्यांना वाटत नाही. पण शेतकऱ्याच्या नावाने ते मिरवत राहतात. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी ते आपल्या उद्योगपती मित्रांना मदत करतात. महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या वाढत आहे, तरुणांच्या हाताला काम नाही. पण सरकार याबाबत काहीही करताना दिसत नाही. सर्वसामान्यांचे हे प्रश्न घेऊन आम्ही विधानसभेला सामोरे जाणार आहोत. सामान्य माणूस हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल, असे सांगत धीरज देशमुख यांनी मेळावा गाजवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.