
Dharashiv News : ज्याचे आर्थिक, विकासाचे धोरण ठरवण्याचा मान तुळजापूरलाही मिळाला आहे. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील यांवी 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' अर्थात 'मित्रा'च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राणाजगजितसिंह पाटील हे मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र ते मिळाले नाही. दावेदार असतानाही मंत्रिपद मिळाले नाही, तरीही नाराज न झालेल्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांची आता 'मित्रा'च्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
दिलीप वळसे पाटील, डॉ. राजेश क्षीरसागर यांचीही मित्राच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गुरुवारी राज्य सरकारने यासंबंधीचाआदेश जारी केला आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशम' अर्थात 'मित्रा' या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था राज्याची आर्थिक व धोरणात्मक दिशा ठरवते. 'मित्रा'च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे सहअध्यक्ष आहेत. कृषी, कृषी संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास आदी क्षेत्रांत या संस्थेमार्फत काम केले जाते.
विकासात प्रादेशिक समानता आणण्यासाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रादेशिक 'मित्रा'चीही स्थापना करण्यात येणार आहे. राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि सीएसआर फंडाकडून विकासाच्या उपक्रमांसाठी मालमत्तेचे मुद्रीकरण आणि सवलतीचा वित्तपुरवठा आदी नाविन्यपूर्ण साधनांद्वारे अर्थसंकल्पबाह्य संसाधने उभारण्याचा सल्ला देणे, सरकारच्या विविध विभागांना मदत करत असताना स्थानिक पातळीवरील नियोजन आणि विकासात्मक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यांचा डेटा अॅनालिटिक्स माध्यमातून साह्य करणे आदी कामे केली जातात.
विकासाच्या योजनांची, शासनाच्या निर्णयांची, धोरणांची अंमलबाजवणी करणाऱ्या यंत्रणांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी परिणाम आधारित रियल टाइम मूल्यांकनाच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे. अविकसित तालुके आणि शहरांमध्ये विकासाच्या विविध आणि लोकोपयोगी योजना राबविणे आणि त्या कामाचा वेळोवेळी आढावा घेणे, हेही 'मित्रा'चे महत्वाचे काम आहे. याद्वारे राज्याची सेवा कण्याची संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केली,
धाराशिव जिल्ह्यात राणाजगजीतसिंह पाटील हे भाजपचे एकमेव आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेचे डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाले नाही.
त्यामुळे आमदार पाटील यांच्या रूपाने धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळाले आहे. आमदार पाटील यांना 'मित्रा'चे उपाध्यक्ष करून भाजपने जिल्ह्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.