Shiv Sena UBT News : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर उद्या (ता.7) शहरात येत आहेत. लोकसभेत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाल्यानंतर ठाकरे गटातील विशेषतः महिला आघाडीत फूट पडल्याचे दिसून आले होते.
या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा उद्याचा दौरा महत्वाचा समजला जात आहे. परंतु हा दौरा केवळ औपचारिकता ठरू नये, सत्ताधारी पक्षाला धक्का देणारा ठरावा, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपमधील शहर आणि जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे.
विशेषतः पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे चित्र बदलवणारे हे प्रवेश असणार आहे. भाजपचे (BJP) माजी महापौर आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत युती असतांना बंडखोरी करून शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या विरोधात मैदानात उतरलेले राजू शिंदे आपल्या काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरेंच्या पक्षाची मशाल हाती घेणार आहेत. शिवसेना ठाकरे गट भाजपचा खांदा वापरून संजय शिरसाट यांची शिकार या विधानसभा निवडणुकीत करू पाहत असल्याची चर्चा या निमित्ताने जिल्ह्यात होत आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय शिरसाट शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तुटून पडले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर, तर शिरसाट यांची गाडी सुसाट सुटली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचा पराभव झाला असला, तरी मराठवाड्यातून या पक्षाचे तीन खासदार निवडून आले आहेत. यावरून उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाला लोकांची सहानुभूती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत याच सहानुभूतीच्या लाटेचा अधिकाधिक फायदा करून घेण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा संभाजीनगर या आपल्या ढासळलेल्या बालेकिल्ल्याची मोहिम हाती घेतली आहे. पश्चिम मतदारंसघात शिवसेनेच्या उमेदवारीवर सलग तीनवेळा आमदार झालेल्या संजय शिरसाट यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारी ठाकरे गटाने सुरू केली आहे.
त्यासाठी काट्याने काटा काढण्याची खेळी म्हणून भाजपच्या राजू शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पक्षप्रेवशाकडे पाहिले जात आहे. राजू शिंदे आणि संजय शिरसाट हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. गेल्या दहा वर्षापासून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या राजू शिंदे यांना शिवसेना-भाजप युती असल्याने वेटिंगवर राहावे लागत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांनी युती असून संजय शिरसाट यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करत निवडणूक लढवली होती.
बंडखोरी केल्याबद्दल भाजपने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई चा ठपका ठेवत पक्षातून हाकलपट्टीही केली होती. पण तू मारल्या सारख कर मी रडल्या सारखं करतो, असा तो प्रकार होता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काही महिन्यातच राजू शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी झाली होती. स्वतः संजय शिरसाट यांनी राजू शिंदे यांच्या बंडाला भाजपचा पाठिंबा होता, असा आरोप तेव्हा केला होता.
आता 2024 ची विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि विधानसभा महायुती एकत्रित लढणार हे चित्र दिसत असल्याने अनेकांचे आमदार होण्याचे स्वप्न पुन्हा भंगणार आहे. राजू शिंदे यांनी पश्चिम मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येणार नाही हे लक्षात आल्यानंतर ठाकरे गटाशी बोलणी करून संजय शिरसाट यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केली आहे.
आता शिंदे यांची मनधरणी सुरु असल्याचे चित्र मंत्री अतुल सावे, खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे यांनी रंगवले आहे. मात्र गेल्यावेळी प्रमाणे यावेळी राजू शिंदे यांच्या बंडाला भाजपची फूस आहे की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे. राजू शिंदे यांच्यासारखा उमेदवार त्याला भाजपची छुपी साथ अन् ठाकरे गटाला असलेली सहानूभुती या जोरावर संजय शिरसाट यांना यावेळी खिंडीत गाठण्याचे जोरदार प्रयत्न या माध्यमातून सुरू असल्याचे दिसते. ठाकरेंचा हा डाव यशस्वी होतो? की मग एकनाथ शिंदे ते उधलून लावतात हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.