तुषार पाटील
MLA Santosh Danve- Sambhajiraje : कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचे पणतू व कोल्हापूर राजघराण्याचे वारस युवराज संभाजीराजे भोसले व भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांची मैत्री म्हणजे दोन वेगळ्या पिढीतील तरुणांचे घट्ट नाते. संभाजीराजे एकदा घरी आले आणि त्यांच्यातला साधेपणा भावला. पुढे एकमेकांशी बोलत गेलो आणि सतरा वर्षांनी लहान असूनही आमच्यात घट्ट मैत्री झाल्याचे भाजपा आमदार संतोष दानवे सांगतात.
जागितक मैत्री दिनाच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती आणि आमदार संतोष दानवे (Santosh Danve) यांच्यातील मैत्रीचा वेगळाच पैलू त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना उलगडला. संभाजी राजे आणि माझी 2012 मध्ये पहिल्यांदा भेट झाली. भोकरदन येथील निवासस्थानी एका कार्यक्रमानिमित्त राजे आले होते. बराच वेळ त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. ते 'राजे' असले तरी त्यांच्यातील 'साधेपणा'मनाला भावला. त्यांच्या वागण्यातून ते आपल्यातीलच एक व्यक्तिमत्व असल्याचे जाणवले.
त्यावेळी मी नुकताच राजकारणामध्ये सक्रिय झालो होतो. दोघांमध्ये आमच्या 17 वर्षाचे अंतर आहे. मात्र राजेंसोबतच्या (Sambhajiraje Chhatrapati) पहिल्याच भेटीत त्यांच्या स्वभावात आपलेपणा जाणवला. तेव्हापासून आजपर्यंत आमची मैत्री कायम आहे. वडील रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री होते तेव्हा राजे खासदार असताना दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी अनेकदा आमच्या नियमित भेटी होत.
राजे आणि मला दोघांना जंगल सफारीची प्रचंड आवड आहे. समाजकारण व राजकारणात दोघेही सक्रिय असल्यामुळे बऱ्याचदा परिवारासाठी व वैयक्तिक जीवनासाठी फार कमी वेळ मिळतो. त्यातही दोघांचे शेड्युल अत्यंत व्यस्त. तरीसुद्धा आम्ही हा छंद जोपासला. भारतातील बहुतांश अभयारण्य आम्ही पालथी घातली आहेत. संभाजीराजे यांना फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. जंगलामध्ये तंबूमध्ये राहणे, साधे जीवन जगणे असे अनेक अनुभव आम्ही सोबत घेतले.
नियमित आमचे फोनवर बोलणे होत असते. राजे आणि माझ्या खाण्या पिण्याच्या आवडी, रहाणीमान बहुतांशी सारख्याच आहेत. योगायोगाने का असेना परंतु दोन पिढ्यांमधील अंतर आमच्या दोघांमध्ये असूनही आमच्या आवडी निवडी मात्र एकविसाव्यां शतकातील आधुनिक तरुणांसारख्याच आहेत. राजे हे टेक्नोसेव्ही व्यक्तिमत्व आहे.
त्यांच्याकडून अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मित्र म्हणजे काय? तर आपल्यासाठी जो मार्गदर्शक, दिशादर्शक ठरतो तो. राजेंची भूमिका माझ्या वैयक्तिक जीवनात मार्गदर्शकासारखीच आहे. संभाजीराजे यांची आज राजकीय भूमिका ही वेगळी आहे, मात्र आमच्यातील मैत्री त्या पलीकडची आहे, असे संतोष दानवे सांगतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.