
छत्रपती संभाजीनगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर- खुलताबाद मतदार संघात एकमेकांच्या विरोधात लढलेले आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) व सतीश चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. चार दिवसापुर्वी प्रशांत बंब यांनी महापालिकेत धडक देत आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा पाढा वाचला होता. दोन उपायुतांच्या दालनावर 77 लाख तर आयुक्तांच्या दालनावर 23 लाख रुपयांचा खर्च निविदा न काढता करण्यात आल्याचा व इतर घोटाळ्याचे आरोप करत बंब यांनी महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांच्याकडे माहिती मागितली होती.
ती न मिळाल्यामुळे आमदार बंब यांनी 2 जानेवारी रोजी महापालिका गाठत तब्बल सहा तास ठाण मांडले होते. (NCP) त्यानंतर चारच दिवसांनी मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांची त्यांच्या दालनात भेट घेत चर्चा केली. आठवडाभरातच दोन आमदारांनी महापालिकेला भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत सतीश चव्हाण यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याविरोधात दंड थोपटत गंगापूर- खुलताबाद मतदार संघातून आव्हान दिले होते.
निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाल्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. परंतु मागच्या दाराने आमदार झालेल्या सतीश चव्हाण यांचा टीकाव तीन वेळा मतदारांनी निवडून दिलेल्या प्रशांत बंब यांच्यासमोर लागला नाही. बंब यांनी विजयी चौकार लगावत बाहेरून आलेल्या सतीश चव्हाण यांना माघारी धाडले. तेव्हापासून या दोन आमदारांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे.
महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांच्यावर अधिकाराचा गैरवापर करत पैशाची उधळपट्टी आणि घोटाळा झाल्याचा आरोप करत बंब यांनी माहितीच्या अधिकारात काही कागदपत्रे महापालिकेकडे मागितली होती. मात्र बंब यांच्या माहिती अधिकार अर्जाला कुठलाही प्रतिसाद जी. श्रीकांत व त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या आमदार प्रशांत बंब यांनी महापालिकेत येऊन प्रसार माध्यमांसमोर अनेक आरोप केले होते. यावर जी. श्रीकांत त्यांनी बंब यांना हवी असलेली माहिती सात जानेवारीपर्यंत दिली जाईल, असे स्पष्ट केले होते.
ही माहिती बंब यांना देण्याआधीच आमदार सतीश चव्हाण यांनी काल त्यांची भेट घेत चर्चा केल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत आहे. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना अडचणीत आणू पाहणाऱ्या बंब यांच्या विरोधात पाठबळ देण्यासाठी तर ही भेट नव्हती ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षात महापालिकेची पायरीही न चढलेल्या आमदार प्रशांत बंब व सतीश चव्हाण यांच्या अचानक भेटीने या दोन आमदारांमधील संघर्ष अद्याप सुरू असल्याचे दिसून आले.
सतीश चव्हाण यांनी मात्र आपल्या वैयक्तिक कामासाठी महापालिका प्रशासकांची भेट घेतल्याचे माध्यमांना सांगितले. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची फारशी ताकद महापालिकेत नाही. शिवाय विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजित पवारांना सोडून गेलेले आमदार सतीश चव्हाण पुन्हा माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांच्या अचानक महापालिकेकडे मोर्चा वळवण्याची चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.