Chhatrapati Sambhajinagar Politics : पत्रकारिता क्षेत्रात बरं चालेलं असताना इम्तियाज जलील यांना 2014 मध्ये 'एमआयएम' पक्षाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. पंधरा दिवसात तयारी करत इम्तियाज यांनी शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांचा पराभव करत पहिल्याच फटक्यात विधानसभा गाठली. आमदारीकीची पाच वर्ष पुर्ण होत नाही तोच जिल्ह्यात पक्षाची फारशी ताकद नसतांना असदुद्दीन ओवैसीनी इम्तियाज यांना थेट लोकसभेच्या मैदानात उतरवले. (MP Imtiaz Jaleel News)
नशिब जोरावर असलेल्या इम्तियाज यांनी पुन्हा शिवसेनेच्या उमेदवाराला धक्का देत दिल्लीही गाठली. विशेष म्हणजे कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न लढवता, राजकीय पार्श्वभूमी नसतांना पत्रकार ते आमदार, खासदार हा इम्तियाज जलील यांचा प्रवास अतिशय वेगवान ठरला. आता ते 'एमआयएम' या पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.
आमदार झाले तेव्हा शिवसेना-भाजप युती तुटल्याचा फायदा इम्तियाज जलील यांना झाला होता. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात ताकद नाही म्हणून आधी न लढण्याचा निर्णय घेतलेल्या इम्तियाज यांनीच इथे नाही तर मग कुठे लढायचे? असे म्हणत या मतदारंसघातील हिंदु-मुस्लिम जातीय राजकारणाचे महत्व असदुद्दीन ओवैसी यांना पटवून दिले. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हे समीकरण इम्तियाज यांना लागू पडले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सलग चारवेळा विजयी झालेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्याविरुध्द पक्षातूनच बंड झाले. हर्षवर्धन जाधव यांची बंडखोरी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित-एमआयएमची युतीने इम्तियाज जलील यांना खासदारकीसाठी काठावर पास केले. पण काठावर पास झालेल्या या विद्यार्थ्यांने पाच वर्षात जिल्ह्यात आणि संसदेत अशी काही कामगिरी केली, की त्याची दखल सत्ताधारी आणि इतर छोट्या-मोठ्या पक्षांनाही घ्यावी लागली.
गेल्या दहा वर्षात नशीबाची साथ लाभलेल्या इम्तियाज जलीलImtiaz Jaleel यांना दुसऱ्यांदा दिल्ली गाठायची असेल तर फक्त नशिबाच्या भरवशावर राहून चालणार नाही. हक्काची मुस्लीम वोट बँक इम्तियाज यांच्या पाठीशी असली तरी त्यांना खासदार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) हात आता त्यांच्यासोबत नाहीये. ही उणीव एमआयएम कशी भरून काढणार? हा मोठा प्रश्न सध्या उपस्थितीत केला जात आहे. (MP Imtiaz Jaleel News)
महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या भांडणात आपला पतंग याही वेळी हवेत उंच उडणार, अशी भाबडी आशा एमआयएम(AMIM) आणि त्यांचे कार्यकर्ते बाळगून आहेत. विरोध पक्षाचा खासदार म्हणून इम्तियाज यांचे गेल्या पाच वर्षातील प्रगती पुस्तक उत्कृष्ट अशा शेऱ्यांनी भरलेले असले तरी पुढच्या वर्गात जाण्यासाठी त्यांना यावेळी अडथळ्यांची मोठी शर्यत पार करावी लागणार आहे. एमआयएमला नवा मित्र शोधण्यात आलेले अपयश इम्तियाज यांच्या चांगल्या कामगिरीवर पाणी फेरणार असे दिसते. गेल्या निवडणुकीत एमआयएमच्या पतंगाने भल्याभल्यांचे दोर कापले, पण यावेळी मात्र हा पतंग उडण्यासाठी हवाच नाही, अशी परिस्थिती आहे.
Edited By : Rashmi Mane