Pune Newe : पुणे शहरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील काही भागांसह खडकवासला परिसरात येत्या काही तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असल्याने पुण्यात पुढील काही तासांमध्ये धडकी भरवणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
सध्या शहरामध्ये मुठा नदीच्या लगत असलेल्या परिसरामध्ये पाणी शिरले असून सिंहगड रोड परिसरामधील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. नदी लगदच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पावसाचा जोर पाहता शाळांसह कार्यालय आणि आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी पुणेकरांना व्हिडिओ संदेश दिला आहे. मुरलीधर मोहोळ म्हणाले, कालपासून पुणे आणि लगतच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे.
सध्या 50,000 क्युसिकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नदीलगतच्या परिसरामध्ये, वस्त्यांमध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सिंहगड रस्ता संगमवाडी परिसर, पाटील इस्टेट, पुलाची वाडी, खिलारवाडी परिसर येत आहे.
पुणे आणि परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे माझं पुणेकरांना एवढेच आवाहन आहे की आपण सर्वांनी काळजी घेऊया. आपात्काल परिस्थितीच्या दृष्टिकोनातून सर्व प्रशासकीय यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करत असून मी संसदेच्या अधिवेशन असल्याने दिल्लीत आहे. मात्र पुणे महापालिका (PMC) आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या सातत्याने संपर्कात असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुढील काळामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहेच. मात्र नागरिकांनी देखील आपली काळजी घेणे आवश्यक आहे. शाळा, कॉलेज आणि इतर प्रशासकीय इमारतींमध्ये सध्या पूरग्रस्तांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचं काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.